कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, ती आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी मुदत आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक होईपर्यंत डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याच हाती प्रशासक म्हणून सूत्रे राहणार आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आक्टोबर २०२०मध्ये होणे अपेक्षित होते. सहा महिने आधीपासून या निवडणुकीची तयारी सुरु होती. परंतु कोरोनाचा संसर्ग राज्यात प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे राज्य सरकारने सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या.
निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर थांबविण्याचे आदेश दिले. परंतु नोहेंबर-डिसेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे काही अटींवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निश्चिती आणि प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. १६ फेब्रुवारीपासून प्रारूप मतदार याद्या तयार करण्याच्या तसेच दि. ३ मार्च रोजी अंतिम मतदार याद्या प्रभाग निहाय तसेच मतदान केंद्रनिहाय जाहीर करण्याचे आदेश दिले.महानगरपालिका प्रशासन सध्या प्रारूप मतदार याद्यावर आलेल्या सुमारे १८०० हरकती निकालात काढण्याच्या कामात व्यस्त आहे. रात्रंदिवस हे काम सुरू आहे. आणखी दोन दिवसांनी अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तोपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून, रोज रुग्णसंख्या वाढत आहे.
काही जिल्ह्यात तर दिवसा तर काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुसऱ्यांदा मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेत विद्यमान प्रशासकांना ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे.महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा तसेच प्रशासकांना मुदतवाढ देण्यासंबंधीच्या विधेयकाच्या मसुद्यास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक सादर करण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती आयोगाने केली आहे. त्यामुळे आता प्रशासकांना ही मुदतवाढ दिली जाणार आहे.बलकवडेच राहणार प्रशासकमहापालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या कादंबरी बलकवडे यांच्याकडे दि. १६ नोव्हेंबर २०२० पासून प्रशासक म्हणून सहा महिन्यांकरिता कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची मुदत १५ मेपर्यंत आहे. राज्य सरकार कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घ्यायच्या किंवा नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आक्टोबर २०२१पर्यंत घेणे निवडणूक आयोगाला अशक्य आहे.इच्छुकांच्या उत्साहावर पाणीनिवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. मतदारांच्या गाठीभेटी, राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता जोरदार फिल्डिंग लावली होती. छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून मतदारांशी संपर्क साधला जात होता. काहींनी आपल्या सामाजिक तसेच पालिकेतील कामकाजाची पुस्तिका, हॅन्डबिल वाटण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांच्या या उत्साहावर पाणी फिरले आहे.