राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका यांचा २०२० मध्ये झालेल्या कामकाजाचा वार्षिक आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग विभाग यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच उद्दिष्टांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के काम पूर्ण केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. कुष्ठ आणि क्षयरोग विभाग सह. संचालक यांनी हे जाहीर केले आहे.
क्षयरोग विभागाकडील सर्व कर्मचारी यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सरकारी आणि खासगी दवाखाने यांच्याकडील निदान होणाऱ्या सर्व क्षयरुग्णांची नोंदणी शासनाकडे सादर केली. रुग्णांना आरोग्य तपासणी आणि शासनाचे इतर लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. या कामात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, सहा. आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन सर्वांना लाभले.