कोल्हापूर : महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाचे तब्बल ११ कोटी रुपये थकविले आहेत. या प्रकरणी पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेस नोटीस दिली असून, पाणी बंद करण्याचा इशाराही या नोटिसीतून दिला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी उपसा करून महानगरपालिका शहराला पाणीपुरवठा करते. हा बंधारा महानगरपालिकेने बांधला आहे. त्यामुळे १० घनमीटर पाण्यासाठी ७० पैशाप्रमाणे पाणीपट्टी पालिका पाटबंधारे विभागाला भरते. मात्र, पाटबंधारे विभाग चार रुपये २० पैशाप्रमाणे पाणीपट्टी आकारते. त्यामुळे सहा-सात वर्षांची पाणीपट्टी ११ कोटी रुपये महानगरपालिकेकडे थकीत दिसते. याप्रकरणी ‘पाटबंधारे’ प्रत्येक वर्षी नोटीस काढते. मात्र, पाणीपुरवठा बंद केल्यानंतर मोर्चे, आंदोलनामुळे कायदा, सुव्यवस्थेतचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नोटिसीच्या पुढची कार्यवाही पाटबंधारे प्रशासन करीत नाही. परंतु, यावेळी पुन्हा नोटीस काढून पाणी बंद करण्याचा इशारा ‘पाटबंधारे’ने दिला आहे.यासंबंधी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पाणीपट्टी आकारणीवरून वाद सुरू आहे. महानगरपालिकेकडे ११ कोटींची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे नोटीस दिली आहे. जलअभियंता मनीष पवार म्हणाले, ७० पैशाप्रमाणे पाणीपट्टी नियमित पाटबंधारे विभागाकडे भरली जाते. त्यामुळे मनपाकडून पाटबंधारे विभागास कोणतीही देय रक्कम नाही. (प्रतिनिधी )
कोल्हापूर महानगरपालिकेने थकविले पाटबंधारेचे ११ कोटी
By admin | Published: March 20, 2015 11:33 PM