कोल्हापूर : जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ही वाहने दोन तासांत हटवा, अन्यथा कामात अडथळा निर्माण केला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच ‘नेचर’च्या संचालकांनी शुक्रवारी सायंकाळी ही वाहने हटविली.
वैद्यकीय क्षेत्रातून आलेल्या तक्रारी, नेचर इन नीड संस्थेकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि त्यांनी महानगरपालिका प्रशासनाची थकवलेली रॉयल्टी व भाड्याची रक्कम, आदी तीन प्रमुख कारणांची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या प्रशासनाने गुरुवारी ‘नेचर इन नीड’ यांच्या जैववैद्यकीय कचºयाच्या प्रकल्पास सील ठोकून तो स्वत:च्या ताब्यात घेतला होता. अचानक ही कारवाई झाल्यामुळे ‘नेचर’ची दिवसभर शहरात फिरलेली वाहने सायंकाळी प्रकल्पस्थळावर पोहोचली. त्यावेळी वाहनचालकांनी प्रकल्पाच्या गेटसमोरच अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने लावली.
ही माहिती कळताच महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. महापालिकेने स्वत:च हा प्रकल्प चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होईल अशी लावण्यात आलेली वाहने बाजूला करा; तसेच त्यातील जैव कचरा प्रकल्पाकडे जमा करा, अन्यथा कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच सार्वजनिक आरोग्यास अपायकारक परिस्थिती निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेच्या प्रशासनाने दिला. तशी नोटीस वाहनचालकांना दिली.दरम्यान, पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या वादात मध्यस्थी केली. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी सर्व वाहने हटविण्यात आली.चर्चेतून मार्ग निघाला असतागुरुवारी (दि. २८) सायंकाळी अचानक महापालिकेने प्रकल्प सील केला. त्यावेळी ‘नेचर’ची वाहने जैव कचरा घेऊन आली होती. त्यांतील कचरा आत घ्या, अशी विनंती केली असती तरी तो कचरा महापालिकेच्या कर्मचाºयांनी घेतला असता; परंतु ‘नेचर’च्या कर्मचाºयांनी तसे न करता त्यांनी थेट महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ‘या कचºयाचे काय करायचे?’ म्हणून तक्रार केली होती, असे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. दोन तासांत जैव कचरा जमा करा आणि वाहने हटवा, अशी नोटीस देताच ‘नेचर’ने माघार घेतली.
कोल्हापुरातील लाईन बाजार येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाच्या मुख्य गेटसमोर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने शुक्रवारी अशी वाहने आडवी लावली होती. महानगरपालिका प्रशासनाने नोटीस दिल्यानंतर ती हटविण्यात आली.