कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढावा व मतदार जनजागृती व्हावी म्हणून गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे महात्मा गांधी मैदान येथून सकाळी मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, तसेच महापालिका कर्मचारी, प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षकांनी पथनाट्य सादर केले.रॅली गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत, सी. पी.आर. हॉस्पिटल, दसरा चौकमार्गे बिंदू चौकामध्ये विसर्जित झाली.
यावेळी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदारांच्या ओळखीसाठी जरुरीच्या कागदपत्रांविषयीची माहितीपत्रके जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते वाटण्यात आली. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे २३ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये याचे सकारात्मक चित्र दिसणार असून, जिल्ह्यातील तसेच शहरातील मतदान १०० टक्के होईल, अशी अपेक्षा आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी सहभागी झालेले सर्व कर्मचारी, शिक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने जिल्हा निवडणूक शाखेच्या सहकार्याने गुरुवारी शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने सायकल रॅली काढली. या रॅलीत जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी झाले.