कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीने उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक संशयित क्षयरुग्ण तपासणी, निदान व औषधोपचार अशा सर्वच निकषावर उत्कृष्ट काम केल्यामुळे महाराष्ट्रातील २२ महानगरपालिकांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केल्याची माहिती शहर क्षयरोग अधिकारी प्रकाश पावरा यांनी मंगळवारी येथे सांगितली.
महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीने मंगळवारी प्रसिद्धी माध्यमातील प्रतिनिधींसाठी चर्चासत्र आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या हस्ते व डॉ. अमोलकुमार माने यांच्या उपस्थितीत झाले.
क्षयरोग विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०२० मध्ये सरकारी दवाखान्याबरोबरच खासगी दवाखान्यात निदान होणारे क्षयरुग्ण यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या भेटी, बैठका, कार्यशाळा घेऊन क्षयरोग निर्मूलन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग वाढविला. त्यामुळे महापालिका हद्दीत ९० टक्के खासगी रुग्णालयातील नोंद शासन दरबारी करून घेण्यात यश मिळविले, असे पावरा यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरात सावित्रीबाई फुले आणि सदरबाजार येथील रुग्णालयात क्षयरोगावर निदान व उपचार केले जात आहेत. त्याठिकाणी सीबीनॅटसारखे अत्याधुनिक थुंकी तपासणी मशीन असून, २१ केंद्रांवर थुंकी व एस्करे तपासणी मोफत केली जाते. याशिवाय उपचारादरम्यान सकस आहार भत्ताही रुग्णांना दिला जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनव पोळ यांनी निदान, उपचार याची सविस्तर माहिती दिली. डॉ. अशोक पोळ व डॉ. अमोलकुमार माने यांनी क्षयरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले.
- कोल्हापूरचे उद्दिष्ट -
- रुग्ण तपासणी - ५०४३
- प्रत्यक्ष तपासणी - ६७१२
-डिसेंबर २०२० अखेर रुग्ण - १६६
भारतात दिवसाला ६०० मृत्यू -
भारतात रोज सहा हजारपेक्षा जास्त क्षयरोग रुग्ण आढळून येतात, तर ६०० रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील प्रतिवर्ष ४० टक्के लोकांना संसर्ग होतो; परंतु त्यपैकी २२ ते २७ टक्के व्यक्ती बाधित होतात. क्षयरोग हा नियमित उपचाराने पूर्ण बरा होतो. सर्व खर्च सरकार करते, अशी माहितीही यावेळी दिली गेली.