संतोष पाटील - कोल्हापूरकोल्हापूरला ‘विशेष दर्जा’ म्हणून वरच्या श्रेणीत घालण्याचा महापालिकेने ठराव केला होता, परंतु राज्य शासनाने यामध्ये कोणताही बदल न करता ‘ड’ वर्गासाठी असणाऱ्या सुविधा व त्याबाबतच्या माहितीचा आदेश महापालिकेला पाठविला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या आदेशाची सभागृहास माहिती दिली जाणार आहे. शासनाने राज्यातील महापालिकांची सप्टेंबर २०१४ मध्ये वर्गवारी जाहीर केली. अपेक्षित दरडोई उत्पन्न असूनही निव्वळ लोकसंख्येच्या निकषांस अपात्र ठरल्याने कोल्हापूरची महापालिका ‘ड’ वर्गातच राहिली. हद्दवाढीचा प्रश्न रखडल्यानेच कोल्हापूरच्या लोकसंख्येत वाढ होऊ शकत नाही. लोकसंख्येच्या निकषांवरच महापालिकेचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे वर्गीकरण केले जाते. नाशिक व नागपूर शहरांची लोकसंख्या कमी असतानाही ‘विशेष बाब’ म्हणून पुढील वर्गवारीत समावेश करण्यात आला. महालक्ष्मी देवस्थानच्या धर्तीवर राज्य शासनाने कोल्हापूरचाही ‘क’ वर्गवारीत समावेश करावा, अशा मागणीचा ठराव सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत करण्यात आला होता. मात्र, सर्वसाधारण सभेच्या ठरावास शासनाने केराची टोपली दाखविली असून, मनपा ‘ड’ वर्गातच असल्याचे मनपाला कळविले आहे.
कोल्हापूर महापालिका आता ‘ड’ वर्गातच राहणार
By admin | Published: October 31, 2014 1:06 AM