कोल्हापूर : शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडे मुख्य आरोग्यनिरीक्षकचा पदभार कसा? असा प्रश्न विचारत सभागृहात सदस्यांनी गदारोळ माजवला. अखेर डेंग्यू, कचरा उठाव आदी विषयांवरुन वादळी चर्चा होत जबाबदार असणारे मुख्य आरोग्यनिरीक्षक विजय पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश सभाध्यक्ष महापौर शोभा बोंद्रे यांनी दिले.कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात दिवसे-दिवस वाढणाऱ्या डेंग्यू विषयावरुन सदस्यांनी प्रशासनास सुरुवातीपासून लक्ष बनविले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यू’चे रुग्ण शहरभर पसरल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी करत, डेंग्यू मध्ये बळी गेलेल्या कदमवाडीतील संजय लोहारच्या कुटूंबियांना महापालिकेतर्फे मदत जाहिर करावी अशी मागणी केली.
यावर सभागृह नेता दिलीप पवार यांनी, शहराच्या प्रत्येक गल्ली-बोळात ८-१० डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगत खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याचे सांगितले. डेंग्यूबाबत शहरात ठोस उपाययोजना न केल्याने प्रशासनास डेंग्यूं झाल्याचा आरोप भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी करुन प्रशासनाने फक्त डेंग्यू झालेल्या काही भागात भेटी देऊन रुग्णांच्या चुका काढण्याचे काम केल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुख्य आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी शहरात मोजकेच डेंग्यूचे रुग्ण असून उपाययोजना करत असल्याचा खुलासा केला. त्यावर संतोष गायकवाड, विलास वास्कर, भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांनी डॉ. दिलीप पाटील यांच्यावर खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत शहरातील खासगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांनी फुल्ल असताना हा प्रशासनाकडून होणारा अकडेवारीचा फसवा खेळ थांबवा अशी विनंती केली.त्यानंतर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी गुरुवारपासून आठवडाभर विशेष मोहीम सुरु ठेवून ‘डेंग्यू’चे समुळ उच्चाटन करणार असल्याचे सांगून उपाययोजना सांगितल्या. त्यावर सदस्यांनी अक्षेप घेत पाटील यांपूर्वी का केल्या नाहीत असा कडक शब्दात जाब विचारला.