कोल्हापूर : महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने तसलमात घोटाळा केला असून याप्रकरणी आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात फौजदारी दाखल करू, असा इशारा बुधवारी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी आगाऊ रकमा तसलमात म्हणून घेतल्या आहेत. रकमेचा विनीयोग काय झाला, त्याचा तपशील आणि पुरावे उदा. देयके जमा करणे, उरलेली रक्कम परत करणे बंधनकारक असते. आधीच्या तसलमातीचा हिशेब जमा केल्याशिवाय नवीन आगाऊ रक्कम उचलता येत नाही, असा कायदा असूनही कित्येक वर्षे ना हिशेब दिला आहे, ना रकमा जमा केलेल्या आहेत. या रकमा वसूलीसाठी २०१५ मध्ये विभागप्रमुखांना पाठपुराव्याची पत्रे दिली होती परंतू त्यानंतर पुढे कांहीच झालेले नाही. यासंदर्भात दि. ३१ मार्च २०१८ या दिवशी ही रक्कम सात कोटी एक लाख ५४ हजार ८४४ रुपये इतकी असल्याचे उघडकीस आले आहे.
ज्यांनी या तसलमात घेतली होती त्यांच्या पगारातून या रक्कमा वसूल करणे आवश्यक होते; पण असे काही न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. म्हणजेच यात गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावी, त्यांच्याकडून व्याजासह वसुली करावी, अशी मागणी करतानाच जर कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयामार्फत फौजदारी दाखल करू, असा इशारा इचलकरंजीकर यांनी दिला. यावेळी परिषदेचे अॅड. समीर पटवर्धन, हिंदू जनजागृतीचे किरण दुसे आणि बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.घोटाळ्याची काही उदाहरणे अशी -- वैद्यकीय तसलमात एक लाख ३० हजार व एक लाख ५० हजार आहेत.- रंकाळा जलपर्णी काढण्यासाठी आठ लाख १७ हजार ७७० रुपये तसलमात उचल.- के.एम.टी.साठी एक कोटी १५ लाख रुपयांचा खर्च- न्यायालयीन कामकाजासाठी ६५ हजार रुपयांचा खर्च विनापुरावा.- पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी १० महिन्यांत १ कोटी ८५ हजार रुपयांवर खर्च.- पंढरपूर वारीसाठी माधवी मसूरकर यांना २५ हजार रुपये तर फुटबॉल स्पर्धेसाठी तानाजी मोरे यांस ५० हजार रुपये दिले.- २०१८ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ३५ हजार रुपयांची तसलमात घेतली- मंत्रालयातील सचिवांच्या दौºयासाठी १० हजार रुपयांचा खर्च- राष्ट्रीय दिनादिवशी जिलेबी वाटपासाठी साडेसात हजार रुपये.