कोल्हापूर : शहरातील नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्यापासून रोखण्यात अपयश आल्याने नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे, यास जबाबदार धरून महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि पर्यावरण अभियंता समीर व्यांघ्रांबरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
महापालिका हद्दीतील १२ नाल्यांचे सांडपाणी अडविण्यासाठी हरित लवादाने यापूर्वी महापालिकेला नोटीस बजावली आहे. जयंती आणि दुधाळी नाल्याचे सांडपाणी अडवून ते प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात यश आले आहे; पण बापट कॅम्प आणि लाईन बाजार नाल्याचे सांडपाणी अडविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व नाल्यातील सांडपाणी अडवून ते प्रक्रिया करून, सोडण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वी महापालिकेने उच्च न्यायालयात दिले आहे; पण याबाबत निधी येऊनही प्रकल्प राबविण्यात दिरंगाई झाल्याचा ठपका महापालिकेवर ठेवला आहे. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार महापालिकेचे जलअभियंता आणि पर्यावरण अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.