कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्यासह रंकाळा व इतर रस्ते व उद्यान स्वच्छतेचा ध्यास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला आहे. या लोकसहभागातून आयोजित केलेल्या या ‘महास्वच्छता’ अभियानात सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहाजी कॉलेज व कमला कॉलेजच्या एन. सी. सी. व एन. एस. एस.चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व विविध संघटनांनी सहभाग नोंदवून अभियानात उत्साहाने हातभार लावला.
सकाळपासून किमान चार तास राबविलेल्या महास्वच्छता अभियानात सुमारे पाच डंपर कचरा गोळा करण्यात आला. जयंती नाल्यासह महाविद्यालयांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दर रविवारी उपस्थित सहभागी नागरिकांकडून स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला प्रारंभ केला जातो.महास्वच्छता मोहिमेच्या बाराव्या रविवारीही लोकसहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. सकाळी संप व पंप हाऊस येथे स्वच्छतेची शपथ घेऊन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. रविवारी सकाळी अधिकाऱ्यांचे सात गट तयार करून त्याद्वारे ही महास्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
पाहता-पाहता नाल्याचा परिसर स्वच्छ करून परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. या मोहिमेत सकाळी सुमारे पाच डंपर कचरा गोळा करण्यात आला.यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, नारायण भोसले, आर. के. पाटील, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, शहाजी कॉलेजचे प्राचार्य आर. के. शानेदिवान, कमला कॉलेजच्या प्र. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, अनिल घस्ते, डॉ. सुजय पाटील, प्रा. रेखा पंडित, वर्षा साठे, रोटरी क्लबचे गिरीश जोशी, अश्विनी जोशी, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टसचे अध्यक्ष अशोक कोराणे, आर्किटेक्ट नितीन शिंदे, दिलीप देसाई, उदय गायकवाड, महापालिकेच्या सर्व विभागांकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.परिसर केला चकाचकविल्सन ब्रिज लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमागील बाजू ते रिलायन्स मॉलच्या पिछाडीस, सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमशेजारील दफनभूमी, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर, जयंती नाला परिसर, रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूची स्वच्छता करून त्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शहाजी, कमला कॉलेजच्या एन. सी. सी. व एन. एस. एस. विद्यार्थ्याचा सहभागशहाजी कॉलेजचे एन. सी. सी. व एन. एस. एस.चे १०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. त्यांनी स्वच्छता करून वृक्षारोपण केले. राजारामपुरी येथे कमला कॉलेजच्या एन. सी. सी. व एन. एस. एस.च्या ६० हून अधिक विद्यार्थिनींनीही राजारामपुरी परिसरातील उद्यान, खाऊ गल्ली व कॉलेज कॅम्पस परिसराची स्वच्छता करून परिसरात वृक्षारोपण केले.सलगर चहाचा गोडवामहास्वच्छता मोहीम ही सर्वांसाठीच असल्याने यामध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मोफत चहा देऊन रिमझिम पावसात, भिरभिरणाऱ्या वाऱ्यात गरमागरम देण्यात आलेल्या सलगर चहाने मोहिमेतील गोडवा वाढविला.
संघटनांचे लागले हातभाररविवारच्या महास्वच्छता अभियानामध्ये कोल्हापूर क्रिडाई, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस, कोल्हापूर शहर प्राचार्य संघटना, स्वरा फौंडेशन, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर, इनरव्हील क्लब, शहाजी कॉलेज व कमला कॉलेजच्या एन. सी. सी. व एन. एस. एस.चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रोटरी, इनरव्हील क्लबने उचलली जबाबदारीमहास्वच्छता अभियानात सहभागी झाल्यानंतर उत्साह वाढतो. त्या पार्श्वभूमीवर ‘रोटरी’चे अध्यक्ष गिरीश जोशी आणि इनरव्हील क्लबच्या अश्विनी जोशी यांनी सहभाग नोंदविला. पंपिंग स्टेशन परिसरातील जयंती नाल्याची डावी बाजू रोटरी क्लबने, तर उजवीकडील जमीन वृक्षारोपणाने विकसित करण्याची जबाबदारी इनरव्हील क्लबने उचलल्याचे यावेळी जाहीर केले.चार तासांत पाच ट्रक डंपर कचरा गोळारविवारी सकाळी सात वाजता मोहीम सुरू झाली. अवघ्या चार तासांतील महास्वच्छता मोहिमेत सुमारे पाच ट्रक गोळा करण्यात आला; तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
महास्वच्छता अभियानाचा कोल्हापूरकरांना हा उपक्रम नवीन असला, तरी तो रुजविण्यात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यशस्वी झाले आहेत. जागृतीमुळे मोहिमेत लोकसहभाग वाढत आहे. यामध्ये प्राचार्य संघटनाही सहभागी होत आहेत; याशिवाय महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थीही टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. शहरातील सर्वच महाविद्यालयांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाण्याचा प्रयत्न आहे; त्यासाठी बुधवारी खास बैठकीचे नियोजन केले आहे.- सुरेश शंकरराव गवळी, सचिव, प्राचार्य संघटना (प्राचार्य, केएमसी कॉलेज)
स्वच्छता व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, आपल्याबरोबर परिसराचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेला स्वच्छतेचा ध्यास हा कौतुकास्पद आहे. तो प्रत्येक कोल्हापूरकराने घेतला पाहिजे. त्यातून स्वच्छता चळवळ वाढीस मदत होईल. आम्हीही अत्यंत उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत रममाण झालो. विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम महत्त्वाची आहेच. विशेषत: लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे.- श्रावणी भोसले, विद्यार्थिनी, एन. एस. एस., कमला कॉलेज.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले महाविद्यालय, तसेच घरचा परिसर तरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. महापालिका, लोकसहभाग व एन. एस. एस.चे विद्यार्थी अशा संयुक्त महास्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही भरपूर आनंद घेतला. हा महास्वच्छता मोहिमेचा उपक्रम चांगला आहे. प्रत्येकाने थोडा-थोडा वेळ त्यासाठी दिल्यास कोल्हापूर चकाचक व्हायला व राज्यात नाव व्हायला वेळ लागणार नाही. लोकप्रतिनिधींसह प्रत्येक राजकीय पक्षांनीही या मोहिमेचे महत्त्व समजावून घेऊन सहभागी व्हावे.- प्रदीप तेलवेकर, विद्यार्थी, एन. एस. एस. शहाजी महाविद्यालय.
स्वच्छता मोहिमेचे आयुक्तांचे काम कौतुकास्पद आहे. खरे तर, यापूर्वीच ही मोहीम कोल्हापूरकरांनी हाती घेणे आवश्यक होते. या मोहिमेत सहभागी झाल्यानंतरच स्वच्छतेचे महत्त्व कळाले. या मोहिमेत आणखी लोकसहभाग वाढ होणे आवश्यक आहे, खरे तर नगरसेवकांचा यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होणे आवश्यक आहे; त्यामुळेच शहरातील तालीम संस्था, मंडळांच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग होणे आवश्यक आहे.- प्रमोद माजगावकर, अध्यक्ष, स्वरा फौंडेशन, कोल्हापूर