कोल्हापूर : गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि गोपाळ खेर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) ‘गानसरस्वती’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘स्वर अविनाशी’चे आनंद धर्माधिकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.‘प्रतिज्ञा नाट्यरंग’च्या सहकार्याने केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री नऊ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात किशोरीतार्इंच्या बंदिशी, तराणे, ठुमरी, भावगीत, भजन अशा अनेक गीतप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाची संकल्पना आनंद धर्माधिकारी यांची असून गौरी, प्रल्हाद जाधव आणि डॉ. आनंद यांचा स्वरसाज असेल. त्यांना नितीन, गिरिधर कुलकर्णी आणि केदार गुळवणी यांची संगीतमय साथ असेल. मनीष आपटे निवेदन करणार आहेत. यावेळी पं. अरुण कुलकर्णी आणि व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.या कार्यक्रमाच्या प्रवेशिका झोरबा हॉटेल, पापाची तिकटी येथील आभूषण बेंटेक्स दुकान आणि केशवराव भोसले नाट्यगृह येथे मिळतील. प्रवेशमूल्य ऐच्छिक असून जमणारा निधी शुभ्रा जाधव यांचा मुलगा चिन्मय जाधव याच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. तरी रसिकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला बाळासाहेब कदम, ‘प्रतिज्ञा’चे प्रशांत जोशी, प्रसाद कुलकर्णी, गायक प्रल्हाद जाधव उपस्थित होते.