कोल्हापूर : मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, राधानगरी, आजरा, भुदरगड, करवीर, शिरोळ, मौजे हुपरी, हातकणंगले या विविध गावांमधील जमिनी शंकराचार्य पीठाच्या मालकीच्या नसून आमच्या आहेत. जमिनी पीठाच्या असल्याचा पुरावा नसताना पीठाकडून शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे.
पीठाला शेतसारा गोळा करण्याचा दुमालदार म्हणून अधिकार होता, तो १९४५ साली काढून घेण्यात आला आहे. जमिनींशी शंकराचार्य पीठाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावाच्या पोकळ नोंदी आहेत; तर काही गावांत नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र शंकराचार्य पीठाने केलेल्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पोकळ नोंदीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी जमिनी शासनाला लिहून देण्याचा प्रयत्न पीठाकडून सुरू आहे. तरी शासनाने करवीर पीठाकडून होत असलेला अन्याय थांबवावा. सातबारावरील करवीर पीठाचे नाव कमी करावे, जमिनी देवस्थानात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत.
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, वारसा नोंदी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात लक्ष्मण पाटील, मलगोंडा पाटी, बाबासाहेब कागवाडे, शिवाजी जिलबिले, हिंदुराव पाटील, सर्जेराव कामते, गणपती मगदूम, सचिन पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.
वरील सर्व जमिनी या करवीर पीठाच्या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. जमिनीच्या सातबारावर पीठाचेच नाव असून, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे करता येत नाहीत. याबाबतचे सर्व पुरावे करवीर पीठाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. याच शेतकऱ्यांनी २०१३ साली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या जमिनी करवीर पीठाच्या असून आम्ही खंड भरत आहोत, असे निवेदन दिले आहे.- शिवस्वरूप भेंडे, सचिव, शंकराचार्य पीठ, करवीर