कोल्हापूर : राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये मुंबई, पुणे, आदी मोठ्या परिक्षेत्राचा दबदबा आहे. ही मक्तेदारी कोल्हापूर पोलिस दलाने मोडीत काढावी. ‘तुम्हीही अव्वल स्थानी या’ व ‘कोल्हापूर परिक्षेत्र’चे नाव अव्वल स्थानावर न्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. ४४ व्या कोल्हापूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस मुख्यालय मैदान येथे सोमवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सैनी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. डॉ. सैनी म्हणाले, पोलिसांच्या अवघड आव्हानात्मक कर्तव्यानंतरही तुम्ही मंडळी क्रीडा प्रकारातून कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाचे नाव उज्ज्वल करीत आहात ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. याचबरोबर तुमच्या जोडीला महसूल विभागातील क्रीडा प्रकारातून कोल्हापूर जिल्हाही अग्रस्थानी नेऊ, असेही जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले.जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, स्पर्धेत कोल्हापूर शहर, मुख्यालय, इचलकरंजी-जयसिंगपूर, करवीर, शाहूवाडी-गडहिंग्लज अशा पाच विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यात १२० स्पर्धक सहभागी होणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आभार मानले. यावेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, उपअधीक्षक आर. आर. पाटील, भारतकुमार राणे, अमरसिंह जाधव, सूरज गुरव, आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील पोलिस मुख्यालय येथे सोमवारी ४४व्या जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, धावपटू युवराज गुरंबे, उपअधीक्षक सतीश माने उपस्थित होते.भालाफेक (पुरुष)- अजित गुरव (मुख्यालय), अनिल पाटील (जयसिंगपूर-इचलकरंजी).धावणे - १० हजार मीटर- युवराज गुरंबे (शाहूवाडी - गडहिंग्लज), नीलेश सूर्यवंशी (करवीर), महिलांमध्ये पाच हजार मीटर धावणे सोनाली देसाई (मुख्यालय), भाग्यश्री वडर (शाहूवाडी-गडहिंग्लज).गोळाफेक - संपदा कुटरे (मुख्यालय), अमृता मोरे (कोल्हापूर) .
‘कोल्हापूर’चे नाव अव्वल स्थानी न्या’
By admin | Published: September 27, 2016 12:49 AM