कोल्हापूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नाम, मध्यभागी माउलींची चांदीची पालखी आणि भोवतीने फिरणारे अश्व, मधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा मंगलमयी वातावरणात आज, गुरुवारी नंदवाळ दिंडीतील रिंगण सोहळा पार पडला.कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडी सोहळ्यात चांदीची पालखी होती. पालखीपूजन झाल्यानंतर वारकरी नंदवाळच्या दिशेने निघाले. विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने भजन, कीर्तन करीत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर पुईखडी येथील मोकळ्या पटांगणात दोन अश्वांनी केलेला रिंगण सोहळा अनेकांनी अनुभवला. आमदार जयश्री जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. त्यानंतर पुन्हा पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले.
कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी
By सचिन भोसले | Published: June 29, 2023 3:58 PM