कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून त्याचे रणशिंग उद्या, रविवारच्या मेळाव्यात ते फुंकण्याची दाट शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात ‘ढाल-तलवार’ घेण्याची मानसिकता त्यांच्या गटाची आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर त्यांनी झोकून देऊन काम केले. मात्र पक्षाने सातत्याने अन्याय केल्याची भावना त्यांची आहे. पक्षनेतृत्वाने अनेक वेळा आश्वासने देऊनही शब्द पाळला नाही. गेली अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करुनही योग्य तो सन्मान दिला नाही, याची खंत त्यांच्या मनात आहे. कडगाव येथील कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हजर होते. त्यांनीही दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे.उद्या, दुपारी बारा वाजता सोळांकूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. यामध्ये कार्यकर्ते पक्षनेतृत्वाने सातत्याने अपमानित कसे केले याचा पाढा वाचणार आहेत. स्वत: पाटील हे मनातील खदखद व्यक्त करणार असून ते बंडाचा झेंडा हातात घेण्याची दाट शक्यता आहे.
भूमिपूजनानिमित्त ‘आबिटकर- ए. वाय.’ एकत्रशुक्रवारी सोळांकूरातील ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील एकत्र होते. येथे राजकीय जुगलबंदी रंगली नसली तरी पाटील यांनी पक्षाला संदेश द्यायचा तो या निमित्ताने दिल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीला हादरा बसणारए. वाय. पाटील यांनी बंड करुन राष्ट्रवादीशी फारकत घेतली तर राष्ट्रवादीला हादरा बसू शकतो. आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा त्रास होऊ शकतो.