कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार दोन्ही कॉँग्रेसनी केला आहे. जागावाटपात फारशी ताणाताणी होईल, असे वाटत नसले तरी विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार असल्याने पेच निर्माण होऊ शकतो.
राष्ट्रवादीकडे सध्या येथून ताकदीचा उमेदवार नसला तरी ऐनवेळी मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरवून भाजपसह शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती आहे.भाजपचा संपूर्ण देशात उधळलेला वारू रोखण्यासाठी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्याला कॉँग्रेसने पाठबळ दिल्याने आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक दोन्ही कॉँग्रेस एकसंधपणे लढणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीने संघटनात्मक पातळीवर फेरबदल करून निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला आणून दिशा स्पष्ट केली आहे. पाटील यांनी जिल्हानिहाय पक्षबांधणीचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यातील एका शिष्टमंडळाने नुकतीच प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद, कॉँग्रेसचे प्राबल्य आणि विरोधी शिवसेना-भाजपची तयारी यांची चाचपणी केली. यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला.विधानसभा निवडणुकीत दहापैकी पाच जागा राष्ट्रवादीला घेण्याची रणनीती प्रदेशाध्यक्षांची आहे. ‘चंदगड’, ‘कागल’ येथे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, ‘राधानगरी-भुदरगड’, ‘शिरोळ’मध्ये पक्षाची ताकद आहे. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या जागावाटपात येथे फारशी ताणाताणी होणार नाही.
‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत; पण येथून कॉँग्रेसतर्फे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी तयारी केल्याने पेच निर्माण होऊ शकतो. ‘करवीर’, ‘दक्षिण’ आणि ‘उत्तर’ हे शहराशेजारील तिन्ही मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीचे नेते तयार होतील, असे वाटत नाही.‘उत्तर’मधून लढण्यास राष्ट्रवादीकडे सध्या चेहरा तरी दिसत नाही; पण येथून माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांना राष्ट्रवादीमधून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मधुरिमाराजेंचे नाव पुढे आल्यास कॉँग्रेसही शांत होईल आणि छत्रपती घरण्याबद्दल शहरात कमालीचा आदर आहे. त्यात स्वर्गीय खानविलकर यांच्या पुण्याईच्या बळावर मधुरिमाराजे सहज विजयी होतील, असे गणित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर मांडले आहे.
मधुरिमाराजे यांचे नाव कॉँग्रेस, भाजपकडूनही घेतले असले तरी मुळात शाहू छत्रपती यांनी अजून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील न दाखविल्याने कॉँग्रेस, भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. शाहू छत्रपती यांचे मन वळविण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच करू शकतात. पवार यांनी शब्द टाकल्यास शाहू छत्रपतीही राजी होतील, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.
‘के.पी., ए.वाय.’ यांची वरिष्ठांवर जबाबदारीराधानगरी-भुदरगड मतदारसंघावर के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी दावा केल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोर पेच आहे. मेहुण्या-पाहुण्यांतील तिढा वरिष्ठ पातळीवरूनच सोडविण्याची नेत्यांनी तयारी केली आहे.