कोल्हापूर : महावितरणच्या भरमसाट वीज दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप करत शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शुक्रवारी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरवाढ कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र जमले. या ठिकाणी महावितरणच्या दरवाढीचा निषेध करत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यानंतर मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी सागर मारुळकर यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरणची बिले सध्या भरमसाट येत आहेत; त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे अक्षरश: मोडले आहे. ही बाब गंभीर असून युनिटच्या तुलनेत बिल येणे हे क्रमप्राप्त असताना स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क १६ व २१ टक्के, वीज विक्री कर ०.०९ एवढे आकार युनिट सोडून आकारले जातात. याला कोणता आधार आहे, याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. गेली कित्येक वर्ष युनिटला ० ते १०० ला ३.०७ रुपये, १०१ ते ३०० ला ६.८१ रुपये, ३०१ ते ५०० ला ९.७६ रुपये, ५०१ ते १००० ला ११.२५ रुपये, १००० युनिटच्या वर १२.५३ रुपये आकारले जात आहेत. यामध्ये बदल करून युनिटचा स्लॅब ० ते २००, २०० ते ४००, ४०० ते ६०० असा करावा. जेणेकरून गरिबांचा फायदा होईल व सामान्य माणसाला दिलासा मिळेल. याप्रमाणे महावितरणने कार्यवाही न केल्यास उग्र आंदोलन करून महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल.आंदोलनात सुनील देसाई, फिरोज सरगुर, जहिदा मुजावर, भीमराव आडके, किशोर माने, शारदा गायकवाड, स्मिता भोसले, निलोफर शेख, नसीम शेख, अनिता टिपुगडे, आदी सहभागी झाले होते.