कोल्हापूर : साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.
आपण यासाठी मंगळवारी (दि.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अन्न व नागरि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना भेटणार आहे, अशी माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
देसाई म्हणाले, भारतात आज साखरेचे दर प्रति किलो २८ रुपये असून ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यासाठी सर्व साखर कारखानदार व त्यांच्या संघटना साखर निर्यात अनुदान प्रति क्विंटल १००० रुपये म्हणजे प्रतिटन १० हजार रुपये शासनाकडे मागत आहेत. यातून ४० लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे.
वास्तविक परदेशात साखरेचे दर भारतापेक्षा कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातीस परवानगी मागणे हे कोणत्या शास्त्रात बसते हा प्रश्न आहे.ते पुढे म्हणाले,यावर रामबाण उपाय म्हणजे ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या धोरणाला सरकारने परवानगी द्यावी. यामुळे ऊसाला ३८०० ते ४००० रुपये दर निश्चित मिळू शकतो. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडून इथेनॉल निर्मिती धोरणाची मागणी मान्य करुन घ्यावी. यावेळी नारायण पोवार, सुजाता देसाई उपस्थित होते.