कोल्हापूर : समाजामध्ये शांतता आणि सौहार्दाच्या प्रस्थापनेसाठी सार्वत्रिक स्तरावर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी येथे केले.
महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि पाचगणीतील बहाई अकादमीतर्फे आयोजित केलेल्या मूल्यशिक्षणविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमास बहाई अकादमीचे डॉ. लेसन आझादी, शशी गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, महात्मा गांधी यांची मूल्यशिक्षणावर नितांत श्रद्धा होती. भारतीय समाजात मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. आज प्रत्येकजण कोणत्याही मूल्यांपेक्षा पैसा या मूल्याच्या अधिक पाठी लागल्याचे दिसत आहे; पण, अखेरीस जीवनात शांती हवी असेल, तर नैतिकता आणि मानवी मूल्यांचेच स्थान सर्वोच्च आहे. हे मूल्यशिक्षण एका दिवसात निर्माण होणारी बाब नाही. शिक्षणव्यवस्थेत प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रूजवात करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेची निर्मिती करता येणे शक्य आहे.
केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे काम मूल्ये करतात. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मनुष्य विविध प्रकारच्या पर्यावरणातून वाटचाल करतो. हे सारे पर्यावरण त्याच्यातील मूल्यव्यवस्थेला आकार देण्याचे काम करते. या कार्यक्रमात डॉ. आझादी आणि डॉ. गायकवाड यांनी मूल्यशिक्षणाबाबत बहाई अकादमी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. डॉ. एस. डी. कोरे यांनी आभार मानले.