कोल्हापूर : आत्मज्ञानी, विज्ञानी असा नवा माणूस आणि नवी मानवी वस्ती निर्माण करणारे आंदोलन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ‘नवे-गाव आंदोलना’द्वारे उभारले. समाजातील सध्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या आंदोलनातील विचार आपल्या सर्वांमध्ये येणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये वाचनकट्टा प्रॉडक्शनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, तर गीता पाटील, शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे म्हणाले, प्राचार्य पी. बी. पाटील यांनी अत्यंत वेगळे आणि कृतिशील विचार या पुस्तकांच्या माध्यमातून दिले आहेत. ते विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. गीता पाटील म्हणाल्या, ग्रामसेवक ते प्रशासनापर्यंत ‘नवे-गाव आंदोलन’ पोहोचण्याची गरज आहे.या कार्यक्रमात महेश थोरवे, शशिकांत सुतार, सुमय्या मंगळूरकर, गिरिजा गोडे, प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब भोसले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रताप पाटील, सुहास राजेभोसले, नंदिनी निकम, एस. डी. पाटील, आदी उपस्थित होते. शाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी ‘कोल्हापूरची लावणी’ सादर केली. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. उत्तम तळवार यांनी सूत्रसंचालन केले. वनिता कदम यांनी आभार मानले.