कोल्हापूर : राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज घेऊन परदेशात पळून जाणारे नीरव मोदी, विजय मल्ल्या चालतात पण प्रामाणिकपणे काम करणारे महिला बचत गट का चालत नाहीत? असा आरोप करत सोमवारपासून ‘मनसे’च्या पुढाकाराने जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तत्पूर्वी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगारनिर्मितीसाठी राष्ट्रीयकृत बँकांतून प्राधान्य दिले आहे; परंतु या बँकांच्या अधिकाऱ्यांकडून नियम, अटी, कागदपत्रांची पूर्तता या नावाखाली शासनाच्या या योजनेला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून २२ ते ४० टक्केपर्यंत व्याज घेऊन महिला बचत गटांना लुटण्याचे काम गेले दहा ते पंधरा वर्षे होत आहे. एकंदरीत राष्ट्रीयकृत बँकांच्या अनास्थेमुळेच महिला बचतगटांवर ही वेळ आली आहे.
बॅँकेसह देशाला फसवून करोडो रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केलेले नीरव मोदी व विजय मल्ल्या राष्ट्रीयीकृत बँकांना चालतात पण प्रामाणिक महिला बचतगट का चालत नाहीत, अशी उद्दिग्न विचारणा या निवेदनातून करण्यात आली आहे.आंदोलनात ‘मनसे’ वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, गीता कांबळे, उषा जाधव, मेघा साठे, सुनीता कणगांवकर, रचना पवार, सुनीता गोंधळी आदींसह महिला सहभागी झाल्या आहेत.