कोल्हापूर : आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा. वंचित भटक्या समाजाला आरोग्य सेवा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शुक्रवारी राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेत करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आदी प्रश्नांवर विचारमंथन होत असलेल्या या परिषदेचा शनिवारी समारोप होणार आहे.शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीतर्फे आयोजित विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहात राज्य महिला आरोग्य हक्क परिषद होत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ‘धर्म, जाती आधारित उन्मादाचे अस्वस्थ वर्तमान आणि महिलांवर होणारे परिणाम’ याविषयावरील सत्राने झाली. त्यामध्ये अग्रणी सोशल फौंडेशनच्या रिटा माने यांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मांडला.
भारतीय महिला फेडरेशनच्या वसुधा कल्याणकर यांनी औरंगाबाद येथील दंगलीमध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळावी, अशी मागणी केली. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते रवि देसाई यांनी शासनाने महिला धोरणामध्ये आरोग्यविषयक हक्काचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सर्वसमावेशक संस्थेच्या शैला यादव यांनी भटक्या विमुक्त समाजाबाबतचा भेदभाव शासनाने दूर करावा. रोजगार हमी योजनेमध्ये या समाजाचा समावेश करण्याची मागणी केली. शब्बीर कलेगार यांनी अल्पसंख्यांक समाजातील महिलांच्या प्रश्नांची मांडणी केली.
यानंतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे वास्तव, वेश्या व्यवसायातील महिला आणि आरोग्य अधिकार, दिव्यांग महिला, एचआयव्हीची लागण असणाऱ्यां गरोदर स्त्रियांना आरोग्य व्यवस्थेत मिळणारी भेदभावाची वागणूक, विषमता मूलक आर्थिक धोरण आदी विषयांवर चर्चा झाली.परिषदेतील या सत्रांवेळी ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनीषा गुप्ते, संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) जनरल सेक्रेटरी मीना शेषू, अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील, तनुजा शिपूरकर, अनुराधा भोसले, स्मिता पानसरे, सुमन पुजारी, विभुती पटेल, शुभदा देशमुख, लता भिसे, आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. परिषदेच्या समन्वयक काजल जैन यांनी सूत्रसंचालन केले.
‘आसमा’ला अश्रू अनावरआंतरधर्मिय विवाह करणाऱ्या ‘आसमा’ यांनी पहिल्या सत्रावेळी अनुभवकथन केले. माझ्या आई-वडीलांनी हा विवाह अजूनही मान्य केलेला नसल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावर सभागृहातील उपस्थित देखील गहिवरले. पुणे येथील इकोनेट संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्याद्वारे आंतरजातीय, धर्मियविवाहाबाबतची समाजातील वातावरण, होणारा हिंसाचार यावर प्रकाशझोत टाकला.