कोल्हापूर : राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील समाविष्ट असलेल्या १0 रुग्णालयांना योजनेतून कायमचे बंद करण्यात आले आहे; पण त्याबदली कोल्हापूर शहरातील तीन, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एक आणि जयसिंगपूर, इचलकरंजी येथील प्रत्येकी एक अशा सहा नवीन रुग्णालयांचा समाविष्ट करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेत ३२ रुग्णालयांचा समावेश होता. या सर्व रुग्णालयांवर या योजनेचे वरिष्ठ अधिकारी यांनी १४ आॅक्टोबर २०१८ ला छापे टाकले होते. त्यामध्ये चार रुग्णालयांना योजनेतून बाहेर काढण्यात आले होते, तर १0 रुग्णालयांना विविध कारणामुळे तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
या निलंबित रुग्णालयांना वरिष्ठ अधिकारी यांनी सोमवारी (दि. १२) कायमचे बंद केले आहे. त्यामध्ये सुश्रुषा हॉस्पिटल, आनंद नर्सिंग होम, बसरगे हॉस्पिटल, महालक्ष्मी हृदयालय (साई कार्डियॉक), पट्टणशेट्टी हॉस्पिटल, पायोस हॉस्पिटल, गणेश हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.त्या बदल्यात या जनआरोग्य योजनेत लिशा हॉटेल चौकातील ट्युलिप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महावीर महाविद्यालयाजवळील डायमंड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौकातील के.पी. सी. हॉस्पिटल, जयसिंगपूरमधील माने केअर व इचलकरंजीतील अलाईन्स व उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटल यांना समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली.