- भीमगोंडा देसाई कोल्हापूर : अनेक जण शेवटचा पर्याय पोलीस ठाण्याची पायरी चढतात. म्हणून पोलिसांकडे येणाऱ्या सर्वसामान्य, तळागाळातील लोकांना न्याय देण्याला प्राधान्य असेल, असे आश्वासन नूतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शुक्रवारी दिले.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पंडीत हे रूजू झाले. बलकवडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पंडीत म्हणाले, बलकवडे यांनी पोलीस दलात राबवलेले चांगले उपक्रम आणि पायंडे यापुढेेही चालूच राहतील. याशिवाय सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून पोलीस दल काम करेल. पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची तक्रार दखल पात्र असेल तर नोंद होईल. अदखल पात्र असेल तर दखल घेतली जाईल. शंका आणि तक्रारींचे निसरण होईल. शहर, जिल्हयातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जातील. कोल्हापूरला यापूर्वी अंबाबाई दर्शनासाठी येवून गेलो आहे. या जिल्ह्याला पुरोगामी विचाराचा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जिल्हा म्हणूनही जिल्हयाची ओळख आहे. पुन्हा या जिल्हयाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार होईल. आंतर जिल्हा आणि राज्याच्या सीमा जवळ असलेल्या ठिकाणी महामार्गावर अवैध वस्तूंची तस्करी होत असते. या जिल्हयातही अशा तक्रारी रोखण्यासाठी ठोस उपाय योजना राबवल्या जातील. अवैध व्यवसायाविरोधात कडक कारवाई केली जाईल. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.