कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील धान्य मार्केटमध्ये सर्व सुविधा दिल्या आहेत; पण व्यापाऱ्यांच्या पातळीवर अद्याप काहीच हालचाली दिसत नसल्याने लक्ष्मीपुरीतील धान्य मार्केट स्थलांतरास नवीन वर्षात मुहूर्त लागणार आहे.टेंबलाईवाडी येथे धान्य मार्केट हलविण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे व्यापारी तिथे जाण्यास टाळाटाळ करत होते; त्यामुळे तिथे व्यापाऱ्यांची गोडावून व बाजार समितीच्या कार्यालयाची दारे-खिडक्याही जाग्यावर राहिल्या नाहीत.
परिणामी, व्यापाऱ्यांनी तिकडे जाण्यास असमर्थता दर्शविली; पण लक्ष्मीपुरीमध्ये धान्याच्या अवजड वाहतुकीने होणाऱ्या कोंडीमुळे पोलीस यंत्रणा त्रस्त झाली आहे. अखेर वाहतूक शाखेने लक्ष्मीपुरीचा धान्य मार्केट टेंबलाईवाडीला हलविण्यासाठी पुढाकार घेतला.
बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन बाजार हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार समितीने टेंबलाईवाडी बाजारात सर्व सुविधा दिलेल्या आहेत. वीज, पाणी, बंदुकधारी सुरक्षारक्षक, पोलीस चौकीसह इतर सुविधा तिथे दिलेल्या आहेत.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन स्थलांतरित होण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या; पण अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर काहीच हालचाली दिसत नाहीत. ३0 व्यापाऱ्यांनी गाळे यापूर्वीच बांधले आहेत. हे व्यापारी १५ दिवसांंत तिथे जातील, उर्वरित त्यानंतर टप्प्याटप्प्याने जाण्याची शक्यता आहे.पोलीस प्रशासनाने आणखी १५ दिवस व्यापाऱ्यांना मुदत दिल्याचे समजते; त्यामुळे धान्य मार्केटचे स्थलांतर नवीन वर्षातच होणार, हे जवळपास निश्चित आहे.
इतर व्यापाऱ्यांचेही स्थलांतर होणारधान्य व्यापारी टेंबलाईवाडीला स्थलांतर झाले, तर यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यापारीही आपोआपच स्थलांतरित होणार असल्याने लक्ष्मीपुरीमधील वाहतुकीवरील ताण पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे.
बाजार समितीने सर्व सुविधा दिलेल्या आहेत, आता व्यापाऱ्यांनी तिथे जाण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांची बांधकामे पूर्ण आहेत, त्यांना जाण्यास हरकत नाही. उर्वरित व्यापाऱ्यांनीही लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.- सदानंद कोरगावकर,व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती