सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील ठाणे-आळवे बंधाऱ्याजवळील कासारी नदीत बैलगाडी वाहून गेल्याने दोन बैलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, सोमवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास घडली. बैलांना पाणी पाजून गाडीला जुपली असताना रस्त्यावरून येणाऱ्या वाहनामुळे बैलं बुजली आणि उधाळली. यात गाडीसह बैलं नदीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे अंदाजे सव्वा लाखाचे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाडिकवाडी ता. पन्हाळा येथील शेतकरी महादेव नर्सिंग महाडीक शेतात काम करून बैलांना पाणी पाजण्यासाठी ठाणे -आळवे बंधाऱ्यावर घेऊन आले होते. बैलांना पाणी पाजून बैलगाडी त्यांनी रस्त्याच्याकडे उभी केली अन् हातपाय धुवायला नदीत उतरले होते.दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना बैलजोडी बुजल्याने उधळलेली बैलं छकड्यासह नदीच्या पाण्यात गेलीत. कुणाकाही समजायच्या आत बैलं पुराच्या पाण्यात तीस फुट वाहत गेल्याने बुडून मृत्यू झाला..या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Kolhapur News: कासारी नदीत बैलगाडी गेली वाहून, दोन बैलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 3:30 PM