कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष काँग्रेसचा- प्रकाश आवाडेंची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 01:01 AM2019-01-26T01:01:56+5:302019-01-26T01:05:43+5:30

हिंमत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आता राजीनामा देऊन दाखवावा. अन्यथा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, अशी घोषणा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली.जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

Kolhapur: The next president of the Zilla Parishad, Congress- Prakash Awaden announced | कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष काँग्रेसचा- प्रकाश आवाडेंची घोषणा

काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्र्रकाश आवाडे यांचा शुक्रवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत जयवंतराव आवळे व सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी डावीकडून सरलाताई पाटील, संध्या घोटणे, गणपतराव पाटील, नामदेव कांबळे, प्रल्हाद चव्हाण, कल्लाप्पाण्णा आवाडे, संजीवनी गायकवाड उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना जोरदार शक्तिप्रदर्शन; मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : हिंमत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आता राजीनामा देऊन दाखवावा. अन्यथा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, अशी घोषणा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत आवाडे यांनी जिल्हा परिषदेत सत्तांतर अटळ असल्याचे सांगितले.

इचलकरंजीहून रॅलीने कोल्हापूरला येताना ठिकठिकाणी आवाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ताराराणी चौकात आवाडे यांचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आली. तेथून येताना त्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर काँग्रेस कमिटीशेजारील भव्य सभागृहात आवाडे यांचा आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना प्रकाश आवाडे म्हणाले, काँग्रेससाठी भक्कम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आमचा खासदार नाही, आमदार नाहीत, याचा चटका कार्यकर्त्यांना बसला आहे; परंतु आता राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने भाजपची घोडदौड रोखली आहे, त्यामुळे युवक कार्यकर्ता पेटून उठला आहे. आगामी काळात जिल्ह्यात सर्वाधिक आमदार काँग्र्रेसचेच असतील.

हा काटेरी मुकुट आहे. त्यामुळे मी एकटा नव्हे, तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपण जिल्हाध्यक्ष झाल्याच्या भावनेतून काम केले पाहिजे. जिल्ह्यातून अनेक नेत्यांचे फोन आले. त्या सर्वांना एकत्रित बसून निर्णय घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस मजबूत करण्याचे काम करावे लागेल. आठवड्यातून एक दिवस काँग्रेस कमिटीत बसून सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या जातील.
आमदार सतेज पाटील म्हणाले, प्रकाश आवाडे यांचा पायगुण चांगला आहे. माझ्यासह चौघांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यात आवाडे यांना मानणारे अनेक नेते, कार्यकर्ते आहेत. आवाडेंनी त्यावेळी सहकारी संस्था मंजूर केल्याचे आजही नेते सांगतात. या सर्वांना सोबत घ्यावे लागेल. विधानसभेला जागा वाटपामध्ये बारकाईने लक्ष घालावे लागणार आहे.

ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे म्हणाले, एकमेकांची जिरविण्याच्या नादात आम्हा सर्वच नेत्यांची आता जिरली आहे. आता जिल्ह्यात गट-तट मोडून काढावे लागतील. दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी राज्याच्या आणि राष्ट्रीय विविध समित्यांवर निवड झाल्याबद्दल सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश सातपुते, बाजीराव खाडे यांचा सत्कार केला. प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी स्वागते, तर सचिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, दिनकर जाधव, संजीवनी गायकवाड, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, विलास गाताडे, प्रकाश मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, दादासाहेब जगताप, नामदेव कांबळे, किरण कांबळे, हिंदुराव चौगुले, अशोक सौंदत्तीकर, किशोरी आवाडे, सपना आवाडे, सरलाताई पाटील, उदयानी साळुंखे, सुप्रिया साळोखे यांच्यासह तालुकाप्रमुख, सेलप्रमुख उपस्थित होते.

‘ताराराणी’ काँग्रेसमध्ये
ताराराणी आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केल्याची घोषणा आवाडे यांनी केली. जि.प.च्या महिला, बालविकास समितीच्या सभापती वंदना मगदूम, जि.प. सदस्य राहुल आवाडे, हुपरीचे नगरसेवक सूरज बेडगे, रेवती पाटील, गणेश वार्इंगडे, माया रावण, अमेय जाधव, शीतल कांबळे, रेंदाळच्या पं.स. सदस्या संगीता पाटील, चंदूरचे पंचायत समिती सदस्य महेश पाटील, रुईचे अजिम मुजावर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पी. एन. असते तर बरं झालं असतं
पी. एन. आले असते तर बरं झालं असतं, असे सांगून आवाडे म्हणाले, मी त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे बंटी आपल्याला पी. एन. यांच्याशीही बोलून काही निर्णय घ्यावे लागतील. आमच्यात राग, लोभ, रुसवा काही राहिलेला नाही.

राहुल गाठ, कुराडे यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवेळी २0११ साली आवाडे यांचे समर्थक प्रा. किसन कुराडे आणि राहुल गाठ यांना पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती. ही सल लक्षात ठेवलेल्या आवाडे यांनी कार्यालयात प्रवेश करताना कुराडे आणि गाठ यांना बोलावून त्यांच्या हस्ते फीत कापत कार्यालय प्रवेश केला. तसेच पहिल्यांदा कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवून त्यांना नमस्कार केल्यानंतर प्रकाश आवाडे स्वत: खुर्चीत बसले.

दादांनी थांबून रंगवून घेतले सभागृह
ज्या पदासाठी संघर्ष केला तेच पद सन्मानाने चिरंजीवाला मिळाल्याने त्यांचा कार्यालय प्रवेशही झोकात करण्याचा निर्णय कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी घेतला होता. त्यानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत काँग्रेस कमिटीत ठिय्या मारला होता. एका दिवसात शेजारचे भव्य सभागृह रंगविण्यात आले. या सभागृहाचे बांधकामदेखील आवाडे यांनीच पूर्ण करीत आणले आहे.

ही ती ‘ताराराणी’ नव्हे
कधी ना कधी प्रकाश आवाडे यांना काँग्रेसमध्ये यावे लागणार हे माहीत असल्याने आम्ही हुपरीला प्रचाराला गेलो होतो. मात्र, ती आवाडे यांची ताराराणी आघाडी होती. ही ताराराणी आघाडी नव्हे, असे स्पष्टीकरण सतेज पाटील यांनी देताच सभागृहात हशा पिकला. नेटके नियोजन
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. सभागृहामध्ये स्क्रीनवर महात्मा गांधी, नेहरू यांच्यापासून ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. काँग्रेसचे झेंडे, गाणी लावून वातावरण केले.



 

Web Title: Kolhapur: The next president of the Zilla Parishad, Congress- Prakash Awaden announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.