कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठातर्फे यावर्षी बहादरपूर (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्त्या निलिमा चंद्रशेखर मिश्रा यांना भद्रकाली ताराराणी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख, गौरवपत्र, भद्रकाली ताराराणींचे स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनी गुरुवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. पाटील म्हणाले, ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. टी. पाटील यांना त्यांच्या ९० व्या वाढदिनी शिक्षक, सेवकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक दिलेल्या गौरव निधीतून भद्रकाली ताराराणी पुरस्काराची सुरुवात डॉ. व्ही. टी. पाटील यांनी केली. छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाला शोभेल, अशा राष्ट्रीय पातळीवर कर्तृत्वसंपन्न महिलेचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरुवात केली आहे.
यावर्षी पुरस्काराचे १३ वे वर्ष आहे. विविध उपक्रमांतून ग्रामविकास साधणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या निलिमा मिश्रा यांना यावर्षीच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मिश्रा या गेल्या २0 वर्षांपासून ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी सक्षम बचतगटांची स्थापना, विविध उद्योग, शेतकऱ्यासाठी कर्जमुक्ती प्रकल्प, आरोग्यपूर्ण गावांची निर्मिती, आदी उपक्रम राबविले आहेत. या पत्रकार परिषदेस ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, प्रा. ए. एम. साळोखे, अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते.