कोल्हापूर : विनोदामुळे आपली दैनंदिनी कामे खूप सोपी होतात. एखाद्याच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते, असे प्रतिपादन निवृत्त वरिष्ठ बॅँक अधिकारी श्याम भुर्के यांनी केले.करवीर नगर वाचन मंदिर येथे गुरुवारी वि. स. खांडेकर व्याख्यानमालेच्या शेवटचे पुष्प गुंफताना ‘असे वक्ते, अशा सभा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचन मंदिराचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते.भुर्के म्हणाले, मराठी भाषिकांच्या अंत:करणात आपले नाव कोरणारे दोन महान विनोदी लेखक झाले. एक आचार्य अत्रे आणि दुसरे पु. ल. देशपांडे होय. दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूपच फरक होता. मात्र दोघेही गुणीजनांचे चाहते होते. नव्या लेखक, कवीचे कौतुक दोघांनी आयुष्यभर केले.
मोठ्या माणसाची खिल्ली उडवणाऱ्यांच्या अंगी तसेच सुप्तावस्थेतले गुण असावे लागतात आणि त्यातून आलेला जबरदस्त आत्मविश्वास असावा लागतो. हा आत्मविश्वास अत्रे व पु. ल. या दोघांच्याही ठिकाणी होता.यावेळी मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले; तर नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रशांत वेल्हाळ यांनी आभार मानले. यावेळी संचालक प्रा. डॉ. रमेश जाधव, गिरिजा गोडे, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेतील किस्सा....श्याम भुर्के बँकेतील किस्से सांगताना म्हणाले, नवीन लग्न झालेल्या एका बँकेतील अधिकाऱ्यांची रजा रद्द करून साहेबांनी त्याला एका खेड्यातील शाखेत जाण्यास सांगितले. यावर तो अधिकारी टाळाटाळ करू लागला; पण साहेबाने बजावलं, ‘नोकरी आहे म्हणून छोकरी मिळालीय.’ यावर त्याने जायचा निर्णय घेतला. पत्नीची समजूत काढत तिला नियमित पत्र लिहिण्याचे सांगून तो निघाला.
त्यापप्रमाणे पत्नीने पत्र पाठविले. त्याचे काही उत्तर आले नाही. पुन्हा पत्र पाठविले, उत्तर नाही. हा तीन आठवड्यांनी घरी परत आला. पत्नी विचारले, ‘माझी पत्रे मिळाली ना?’ तो म्हणाला, ‘मिळाली; पण पत्रावरची सही नमुन्याप्रमाणे नव्हती म्हणून उत्तर पाठविले नाही.’ हा किस्सा सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.