कोल्हापूर : अतिक्रमण विरोधी कारवाई असो की अवैध बांधकाम विरोधातील कारवाई असो, त्याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई करायची म्हटले की स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिव्या आणि धमक्या ठरलेल्याच आहेत.
एकीकडे प्रशासन म्हणून आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक्तांचा ठोस पाठिंबा असल्याशिवाय कोणतीही कारवाई करायची नाही, अशा विचारात अधिकारी आहेत.गेल्या आठवड्यात अतिक्रमण काढायला गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे तसेच धमकावण्याचे तीन प्रकार घडले आहेत. कारवाई करण्याची प्रक्रिया दबाव टाकून सक्तीने थांबविण्याचे प्रकारही घडले आहेत. अशा प्रसंगात प्रशासन म्हणून आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता असताना ज्यांना धमकी दिली त्यांनीच गुन्हा दाखल करावा, असे आदेश देऊन आपली बाजू सावरून घेतली आहे.पाचगांव रोड, हनुमाननगर परिसरातील अतिक्रमण काढायला गेलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांना नगरसेविका शोभा बोंद्रे यांचे पुत्र व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी शिवीगाळ केली व धमकी दिल्याची तक्रार झाली आहे.
पोवार यांनी याबाबत आयुक्त अभिजित चौधरी, महापौर स्वाती यवलुजे आणि महानगरपालिका कर्मचारी संघाकडे तक्रार दिली. त्यानुसार आयुक्तांनी पोलिसांत जाऊन गुन्हा नोंद करा, अशा सूचना दिल्या. महापौर यवलुजे व त्यांच्या आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेत असल्याचे आश्वासन देऊन नवीन आचारसंहिता करण्याचे मान्य केले. कर्मचारी संघाने महापौरांचे आश्वासन मान्य करीत त्यांचे काम बंद आंदोलन मागे घेतले; परंतु प्रश्न काही सुटलेला नाही. उलट तो धुमसतच राहिला आहे.पंडित पोवार हे आयुक्त तसेच प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून कारवाईला गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगात प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. उलट तुम्हीच तक्रार करा आणि बाकीच्या सगळ्याच प्रसंगांनाही तुम्हीच सामोर जा, असे सांगून प्रशासनाने त्यातून काढता पाय घेतला.
पोवार यांचे वरिष्ठ व ज्यांनी आदेश दिले ते उपनगर अभियंता रमेश मस्कर यांनीही गुन्हा नोंदवायला नकार दिला. यातूनच अधिकारी भीतीच्या छायेखाली काम करीत असल्याचे दिसून येते.
नगरसेवकाची ताकद बघून आंदोलनमहापालिका कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पीडित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज असली तरी संघाचे प्रतिनिधी समोरील नगरसेवक किती ताकदवान आहे, हे पाहून आंदोलन करायचे की नाही हे ठरवितात, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.
नगरसेवक राजू दिंडोर्ले व त्यांचे बंधू विशाल दिंडोर्ले यांनी आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ व मारहाणप्रकरणी कर्मचारी संघाने कामकाज बंद ठेवले. एवढेच नाही तर असे प्रसंग पुन्हा घडले तर संबंधित नगरसेवकांच्या घरात घुसून आमचे कर्मचारी त्यांना बदडतील, असा गर्भित इशारा दिला होता. मग पंडित पोवार यांच्यावर उद्भवलेल्या प्रसंगात हेच संघाचे पदाधिकारी गप्प का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
हस्तक्षेप टाळला तरच ....अतिक्रमण हटाव कारवाईला आमचा कोणाचा विरोध नाही, असे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक नेहमी सांगत असतात; पण तरीही असे प्रकार महिन्या दोन महिन्यांतून घडतच आहेत. प्रशासनाच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचे नगरसेवकांनी टाळले आणि जर अशा घटना वारंवार घडायला लागल्या तर प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन संबंधितांवर कारवाई केली तरच शिवीगाळ, धमकी देण्याचे प्रकार टाळले जातील. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून एक आचारसंहिता ठरविली पाहिजे, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करीत आहेत.