कोल्हापूर :
कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे. शहरात सकाळी दहापासूनच विसर्जन मिरवणूक दणाणू लागली आहे. प्रशासनाने जरी विसर्जनाचे तीन मार्ग ठरवले असले तरी देखील मुख्य महाद्वार रोडवरच्या मिरवणुकीसाठी मंडळाच्यामध्ये चढाओढ दिसून येत आहे. पर्यायी मार्गावरून मोजकी मंडळे विसर्जनासाठी जात आहेत. पोलीस त्यांचे प्रबोधन करत आहेत.परंतु प्रत्येक मंडळाला महाद्वार रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची आस लागली आहे. महाद्वार रोडवरील मिरवणुकीचा पहिला टप्पा असलेल्या मिरजकर तिकटी जवळ काल रात्रीच मंडळांनी आपल्या ध्वनी यंत्रणा आणून लावल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला पुढे सोडा असा आग्रह मंडळे करत आहेत. त्यासाठी वेगवेगळी मंडळे आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. पुढे जाण्यावरून चर्चा सुरू असताना काही ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या गाड्या आडव्या लावल्यामुळे रोष दिसत असून कार्यकर्ते रस्ता रिकामा करण्याची मागणी करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रात्री कोल्हापूर जोरात दणाणनार यात शंका नाही. मिरजकर टिकटीवर सध्या पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ आमने सामने असून मध्ये पोलीस तैनात आहेत.