कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून एकमेकांवर कुरघोड्या करण्यास कुणीही मागे राहत नसल्याचे चित्र बुधवारी ठळक झाले. कसबा बावड्यातील रांगोळी आणि खासदार धनंजय महाडिक यांचे महिलासंबंधींचे कथित वक्तव्य दिवसभर सोशल मीडियावर चर्चेत राहिले.घडले ते असे : भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी बुधवारी सकाळी कसबा बावड्यातून प्रचारफेरी काढली. कसबा बावडा हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे गाव असल्याने तिथे या फेरीला कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल लोकांत उत्सुकताच होती. या फेरीला भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. त्यांनी भाजपच्या स्वागतासाठी कसबा बावड्यातील महिलांनी काढलेली रांगोळी पालकमंत्र्यांच्या चमच्यांनी पाण्याचा टँकर आणून धुवून काढल्याची टीका केली.त्यास पालकमंत्री पाटील यांचे कार्यकर्ते निरंजन पाटील यांनी व्हिडिओद्वारेच प्रत्युत्तर दिले. त्यांच्या मते, ही रांगोळी कसबा बावड्यातील महिलांनी काढलीच नव्हती, तर भाजपच्या उमेदवाराची प्रचार फेरी असल्याने भाजपनेच ती एका महिलेला कंत्राट देऊन काढायला लावली होती. सकाळी साडेसहा वाजता ते जेव्हा रांगोळी काढत होते, तेव्हा त्यांना त्याबद्दल हटकले, तेव्हा त्यांनी भाजपकडून आम्हाला प्रत्येक गल्लीच्या सुरुवातीला अशी रांगोळी काढण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. रांगोळी काढत असतानाचा व्हिडिओही पाटील यांनी व्हायरल केला.रात्री-अपरात्री रांगोळी काढून स्वागत करण्याची बावडेकरांची परंपरा नाही. बावड्यातील महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना स्वागतच करायचेच असते तर हातात आरतीचे ताट घेऊन त्यांनी स्वागत केले असते. एकही महिला रस्त्यावर, दारात नव्हती यावरूनच भाजपच्या उमेदवाराने बावडेकरांच्या मनांत काय आहे हे समजून घ्यावे, अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.महाडिक यांचे वक्तव्य...
- हे सुरू असतानाच माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला. काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत त्यामुळे महिलेला मते द्या, असे ते सांगतील. परंतु जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो ते तुम्हाला जमणार आहे का, ज्याचे काम त्यानेच करायचे असते अशी टिप्पणी महाडिक यांनी केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.
- ताराराणींच्या कोल्हापुरात महिलांचा हा अपमान असल्याचे सांगून काँग्रेसने या वक्तव्याचे चांगलेच भांडवल केले. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर याबाबत टीकेची झोड उठली. या वक्तव्याबाबत धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला