कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:27 PM2022-04-18T12:27:40+5:302022-04-18T12:28:10+5:30

जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले.

Kolhapur North Assembly by election: Satyajit Kadam loses, yet BJP votes boost confidence | कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: सत्यजित कदम पराभूत, तरीही भाजपला मिळालेली मते आत्मविश्वास वाढविणारी

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेली ७८ हजार २५ मते ही ‘कोल्हापूर शहर’ विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले आहे. भाजपला ४५ टक्के मते मिळाल्याने त्यांचा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आत्मविश्वास वाढला आहे.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी दोन वेळा काँग्रेसने त्यांना धक्का दिला होता. यावेळेला पहिल्यांदाच शिवसेना रिंगणात नसल्याने येथील कट्टर शिवसेना मतांची काहीसी परीक्षाच पाहावयास मिळाली. शिवसेनेची मते आपल्या बाजूने खेचण्याचा भाजपच्या नेत्यांनी निकराचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यासाठी भाजपने हिंदुत्वाचा रेटलेला मुद्दा आणि गेल्या पंधरा दिवसांत पेठापेठांत केलेले भगवे वातावरण मतदान यंत्रापर्यंत पोहोचविण्यात भाजपला फारसे यश आल्याचे दिसले नाही. हे जरी खरे असले तरी सत्यजित कदम यांनी दिलेली झुंज निश्चितच कौतुकास्पद आहे.

राज्यातील सत्तेची ताकद, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची एकजूट व प्रचाराच्या धडधडणाऱ्या तोफा त्याच ताकदीने परतवून लावण्याचा कदम यांनी निकराचा प्रयत्न केला. त्यांना अपयश आले असले तरी जाधव यांच्या मागे असणारे सहानुभूतीचे वलय, तिन्ही पक्षांची रसद व राजकीय डावपेच या सगळ्या वातावरणात कदम यांना मिळालेली ठसठसीत ४५ टक्के मते, हेही विसरून चालणार नाही.

कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघाचा १९७२ पासूनचा इतिहास पाहिला तर पराभूत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने एवढी मते कधीच घेतलेली नाहीत. २००९ ला मालोजीराजे हे पराभूत झाले. मात्र, त्यांना ६६ हजार ४४७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना ७८ हजार मते मिळूनही त्यांचा पराभव झाला. कदम पराभूत झाले असले तरी त्यांनी तिन्ही पक्षांच्या विरोधात दिलेली चिवट झुंज भविष्यातील राजकारणाची पायाभरणी मानली जाते. आगामी महापालिकेसह लोकसभा निवडणुकीवर याचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे.

तीन केंद्रांवर समान मते

प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय उत्तर बाजू केंद्रात सत्यजित कदम व जयश्री जाधव यांना २९१-२९१, महाराणा प्रताप विद्यामंदिर, धुण्याची चावी केंद्रात १२५-१२५, तर श्रीराम विद्यालयातील केंद्रात २०१-२०१ अशी तिन्ही केंद्रांत समान मते मिळाली.

१३६ केंद्रांवर सत्यजित कदम पुढे

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांनी ३१२ पैकी तब्बल १३६ केंद्रांवर काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्यापेक्षा जादा मते घेतली आहेत. कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी या कदम यांच्या बालेकिल्ल्याबरोबरच उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, जुना वाशीनाका, टिंबर मार्केट, विद्यापीठ हायस्कूल, खरी कॉर्नर, मंगळवार पेठेतील काही केंद्रांचा समावेश आहे.

या मतदारसंघातून पराभूत उमेदवाराला मते अशी-

१९९९ ॲड. महादेव दादोबा आडगुळे २८ हजार ६८

२००४ सुरेश बळवंत साळोखे ४८ हजार १५

२००९ छत्रपती मालोजीराजे शाहू ६६ हजार ४४२

२०१४ सत्यजित शिवाजीराव कदम ४७ हजार ३१५

२०१९ राजेश विनायक क्षीरसागर ७५ हजार ८५९

२०२२ सत्यजित शिवाजीराव कदम ७८ हजार २५

Web Title: Kolhapur North Assembly by election: Satyajit Kadam loses, yet BJP votes boost confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.