'उत्तर'ची निवडणूक ७ मार्चला शक्य, मोर्चेबांधणी सुुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:00 AM2022-01-21T11:00:52+5:302022-01-21T11:01:41+5:30
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ७ मार्चला होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (दि.२७ जानेवारी) लागू होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम, माणिक पाटील चुयेकर यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
सध्या देशात पाच राज्यांतील निवडणुकींची रणधुमाळी सुुरू आहे. त्यातील शेवटच्या सातवा टप्प्यातील मतदान ७ मार्चला नऊ जिल्ह्यांत होणार आहे. त्यासोबतच कोल्हापूरचेही मतदान होण्याची शक्यता आहे. २७ जानेवारीस अधिसूचना लागू झाल्यास किमान ४० दिवसांचा अवधी मिळतो. त्यामुळे याच दिवशी मतदान होण्याची शक्यता ठळक आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागही निवडणूक तयारीच्या कामात गुंतला आहे. गुरुवारपासून ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात झाली.
राजाराम तलाव येथील हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे १५ व महसूल विभागाचे ३० कर्मचारी मिळून हे काम करत आहेत. पहिल्या दिवशी ३०० मशीनची तपासणी करण्यात आली. सकाळी १० वाजताच तपासणी सुरू होणार होती. मात्र, तपासणीच्या काही वस्तू कुरिअरने यायला दुपारचे एक वाजला. त्यामुळे दोन वाजता प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० मशीनची तपासणी करण्यात आली. आज, शुक्रवार तसेच शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशीदेखील हे काम सुरू राहणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.