Kolhapur North Assembly Constituency : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे. मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांना संताप अनावर झाला होता. मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दुपारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारण समोर आलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. मधुरिमाराजे छत्रपती निवडणुकीतून बाहेर पडल्याबद्दल सतेज पाटील यांनी निराशा व्यक्त केली होती. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली असती माझी ताकद, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी रोष व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ते रागाने निघून गेले.
शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील मोदी यांनी आता सगळा घटनाक्रम सांगितला आहे. "शाहू महाराज हे राजेश लाटकर यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी लाटकर यांच्या वडिलांनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार का नाही असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराज यांनी मी माझ्या सुनेला माघार घ्यायला सांगून तुमच्या मुलाला पाठिंबा देण्याचा न्याय मी देऊ शकतो असं सांगितले. काल अर्ज माघार घेण्याची दिवशी राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न होता. त्यावेळी दोन वाजता लाटकर यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना फोन करुन माझ्या मुलाला न्याय देणार आहात का असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या सुनेला माघार घेण्याचे आदेश दिले. ही घटना आम्हाला कोणाला माहिती नव्हती. पण शाहू महाराजांचा हा मोठा निर्णय कोल्हापुरच्या पुरोगामी विचारांना बळ देणारा आहे. शाहू महाराज आणि लाटकरांचे बोलणं झालं नसतं तर निश्चितच राजेश लाटकर माघार घेऊन आम्हाला पाठिंबा देणार होते," असं सुनील मोदी यांनी म्हटलं.
नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली - मधुरिमाराजे छत्रपती
"राजेश लाटकर सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारून मला उमेदवारी दिली. सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेऊन आम्हाला उमेदवारी देणे ही गोष्ट आम्हाला मनापासून रुचली नव्हती. एक तर तुम्ही लढा, आम्ही थांबतो किंवा आम्ही लढतो, तुम्ही थांबा, असे लाटकर यांना सांगूनही बंडखोरीबाबत मार्ग निघाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली, असे स्पष्टीकरण मधुरिमाराजे छत्रपती यांनी दिलं आहे.