कोल्हापूर : स्थानिक शिवसैनिकांची तीव्र इच्छा असताना देखिल शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठे मन दाखवित विधानसभेच्या कोल्हापूर उत्तरची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. जयश्री जाधव यांची उमेदवार म्हणून काँग्रेसकडून आज, शनिवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर येत्या रविवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे.कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उत्तर मतदार संघातून शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी द्यावी असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. त्यावेळी संपर्क मंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख यांच्या कानावर आपल्या भावना घालू असे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधून शिवसेना लढणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली होती.शिवसैनिकांची आग्रही भूमिका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले दोन दिवस बैठका सुरु होत्या. त्यानंतर गुरुवारी पुन्हा उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीस सामंत, क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते. तर पालकमंत्री सतेज पाटील, उपस्थित होते. बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरविता महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना पाठिंबा देण्याचे ठरले.त्यामुळे ही लढत आता महाविकास आघाडी व भाजप अशीच होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा याही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शर्मा या शिव शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. तर बीग बॉस फेम अभिजित बिचकुलेही या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 7:44 PM