Kolhapur North By Election: क्षीरसागर नॉट रिचेबल, कॉंग्रेसची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 07:15 PM2022-03-19T19:15:49+5:302022-03-19T19:24:23+5:30
क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत असून, त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल आहेत. क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत असून, त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.
‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढण्याची तयारी केली होती. कॉंग्रेस व शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होऊ दे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी दोन-तीन मेळावे घेऊन निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे त्यांना थांबावे लागत आहे.
मैत्रीपूर्ण लढत झाली तर त्याचे राज्याच्या राजकारणावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारासोबत राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आले. त्यामुळे क्षीरसागर समर्थकांमध्ये काहीसी नाराजी दिसत आहे. काँग्रेस नेत्यांसह इतरांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शुक्रवारी दुपारीपासून ते नॉटरिचेबल असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांतून सांगण्यात आले. त्याचबरोबर क्षीरसागर समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड नाराजी व्यक्त केली आहे.