कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर ’ पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील २२ संवेदनशील भागावर पोलिसांनी करडी नजर असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. रोज किमान ७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने अशा संवेदनशील भागात संचलन करण्यास प्रारंभ केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक दि. १२ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस यंत्रणेने तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एक तुकडी मतदार संघातील संवेदनशील भागात फिरुन वॉच ठेवणार आहे, तर दुसरी तुकडी मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्तात राहणार आहे. अतिसंवेदनशील ठिकाणी खडा पहारा ठेवण्यात येणार आहे.
२१ हद्दपार, तीन एनपीडीचे प्रस्ताव
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ गुन्हेगारांवर हद्दपारचे तर तिघांवर ‘ एनपीडीए ’ ॲक्ट अंतर्गत (झोपडपट्टीदादा) प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पाठवले आहेत. गेल्याच आठवड्यात कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत वॉरंट बजावण्यात आले आहेत. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्याची माेहीम सुरु झाली असल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी यावेळी सांगितले.