Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:01 PM2022-04-16T14:01:46+5:302022-04-16T14:03:19+5:30
Kolhapur North By Election Result Live: राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले.
कोल्हापूर - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले. दरम्यान, या विजयानंतर जयश्री पाटील यांनी भावूक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विजयामध्ये दिवंगत पती चंद्रकांत जाधव यांनी ठेवलेला जनसंपर्क उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.
विजयानंतर जयश्री राजे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या जनतेने आपला शब्द पाळला आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला. तसेच महाविकास आघाडीने या निवडणुकीत जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. त्याबरोबरच नेते मंडळी, कार्यकर्त, माझी स्वाभिमानी जनता यांनी अण्णांच्या माघारी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. हा विजय हा कोल्हापूरमधील स्वाभिमानी जनचेचा आहे. महाविकास आघाडीचा आहे. अण्णांनी जे पेरलं ते उगवलं, असं मी म्हणेन. माझ्या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, मालोजीराजे, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांचा हात आहे, असे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत मला मताधिक्य मिळणार ही अपेक्षा होती. जनता आमच्यासोबत होती. त्यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं. तसेच कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित ठरलेला होता. चंद्रकांतदादांचा मुद्दा फोल ठरला आहे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. खरंतर ही पोटनिवडणूक लागायला नको होती. दिवंगत आमदार अण्णांची हक्काची पाच वर्षे होती. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. दुर्दैवाने अण्णांच निधन झालं. परंतु भाजपाने पोटनिवडणूक लावली. खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी मोठेपण दाखवायला हवं होतं. ते त्यांच्यासाठी चांगलं ठरलं असतं, असे त्यांनी सांगितले.
अण्णांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं. पतीचं अपूर्ण काम पूर्ण करणे पत्नीचं कर्तव्य म्हणून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला, असे सांगत जयश्री जाधव यांनी आता जनतेची सेवा करायची आहे. अण्णांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. अण्णांचा आशीर्वाद आहेत, अशी भावना व्यक्त केली.