कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार रुपये किमतीची मालमत्ता आहे; तर २२ कोटी ६३ लाखांचे कर्ज आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जयश्री यांच्या नावे झाली आहे.जाधव यांच्याकडे १ लाख ५५ हजार ६८० रुपयांची रोकड असून एक कोटी २३ लाख ४१ हजार ९६५ रुपयांच्या बँक ठेवी आहेत. त्यांची शेअर्समधील गुंतवणूक एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची आहे; तर राष्ट्रीय बचत योजनेतील त्यांची गुंतवणूक २८ लाख ३६ हजारांची आहे. त्यांच्या वापरात असलेल्या दोन अलिशान कारसह उद्योग व्यवसायांत मिळून एकूण बारा वाहने आहेत.जाधव इंडस्ट्रीजसह अन्य कंपन्यांतील जाधव यांची गुंतवणूक ३१ कोटी ०४ लाख ९८ हजार ४१६ एवढी आहे. त्यांच्या नावावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य ५७ लाख ३३ हजार ५८२ इतके आहे. निवासी इमारतीचे मूल्य ४ कोटी ६० लाख ०४ हजार एवढे आहे. जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार इतकी स्थावर व जंगम मालमत्ता असून २२ कोटी ६३ लाख २४ हजार २८ रुपयांचे कर्जदेखील आहे.
सत्यजित कदम २१ कोटींचे मालक
भाजपचे ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम हे २१ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये आपल्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. तर त्यांच्यावर टोल, हद्दवाढ आणि कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या बाजूने केलेल्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल आहेत.
कदम यांच्याकडे यांच्याकडे ४ लाख ३२ हजारांची रोकड असून, विविध बँकांमध्ये ६१ लाख १६ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी विविध कंपन्यांचे समभाग आणि म्युच्युअल फंडामध्ये १० लाख ७५ हजारांची गुंतवणूक केली आहे. तसेच १ कोटी पाच लाख रुपये संस्था, कंपनी किंवा वैयक्तिक कर्ज म्हणून दिले असून, सव्वा पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत. अशी सर्व गुंतवणूक २ कोटी ९८ लाख रुपयांची आहे.
कदम यांच्याकडे शेती, भूखंड, फ्लॅट, इमारती, भागीदार असलेल्या कॅडसन फोटो कलर लॅब, कॅडसन डिझेल, केएम डेव्हलपर्स, केएम डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स या माध्यमातून १७ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.