कोल्हापूर उत्तरचे रणांगण: किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास विजयी गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:12 AM2022-04-07T11:12:19+5:302022-04-07T11:13:02+5:30
गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किमान ९० हजार मते घेणाऱ्या उमेदवारास गुलाल लागू शकतो, असे चित्र दिसते. गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात १ लाख ४५ हजार ७६८ पुरुष आणि १ लाख ४६ हजार १८ महिला मतदार आहेत. इतर मतदार १२ आहेत. असे एकूण २ लाख ९१ हजार ७९८ मतदार आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. राज्याच्या सत्ताकारणावर या एका जागेचा फारसा परिणाम होणार नसला तरी दोन्ही पक्षांनी ही लढत प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न होणार हे नक्कीच आहे. मुख्यत: ताराबाई पार्क, नागाळा पार्क व काही प्रमाणात राजारामपुरीतील उच्चभ्रू वसाहती व मोठ्या अपार्टमेंटमधील मतदान कितपत बाहेर येते याबद्दलच साशंकता आहे. या टापूत कायमच मतांची टक्केवारी कमी असते.
गेल्या निवडणुकीत एकूण १ लाख ७५ हजार २०७ मतांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ५३, तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर ’नोटा’ची ३०३९ मते होती. राहिलेली ५ हजार २६१ मते सात उमेदवारांना मिळाली होती. या निवडणुकीतही दोन मुख्य उमेदवारांतच मतांची विभागणी होणार आहे. अन्य १३ उमेदवारांमध्ये प्रबळ उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत इतर उमेदवारांना कमीत कमी ३४२ ते जास्तीत जास्त १४८३ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जाधव १५ हजार १९९ मतांनी विजयी झाले होते.
मुद्दे हरवलेली निवडणूक
गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्रित लढली होती. दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या होत्या. आता दोन्ही काँग्रेससह शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. प्रचारात विकासाचे मुद्दे हरवले आहेत. व्यक्तिगत टीका, एकमेकांची उणीदुणी काढून वातावरण गरम केले जात आहे. मतदार मात्र हे सारे शांतपणे पाहत आहे. तो अजूनही त्याच्या मनांत काय आहे याचा थांगपत्ता लागू द्यायला तयार नाही.
मागील तीन निवडणुकांतील मतदानाची सरासरी
- २००९-५७.१६ टक्के
- २०१४-६१.६५ टक्के
- २०१९-६१.२० टक्के