कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणूक : जयश्री जाधव यांचा भाजपकडून लढण्यास नकार; लढत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 11:31 AM2022-01-14T11:31:01+5:302022-01-14T11:31:49+5:30

भाजपही ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना याचे सूतोवाच केले.

Kolhapur North constituency by election Jayashree Jadhav refuses to contest from BJP | कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणूक : जयश्री जाधव यांचा भाजपकडून लढण्यास नकार; लढत होणार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणूक : जयश्री जाधव यांचा भाजपकडून लढण्यास नकार; लढत होणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपकडून लढण्यासाठी जयश्री जाधव यांनी स्पष्ट नकार दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जाधव यांनी त्यांना याबाबत स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे भाजपही ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना याचे सूतोवाच केले.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होईल अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या चिन्हावर नगरसेविका झालेल्या जयश्री जाधव यांची पाटील यांनी भेट घेतली. यावेळी दिवंगत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित, उद्योजक योगेश कुलकर्णी उपस्थित होते.

भेटीनंतर बोलताना पाटील म्हणाले, युतीमध्ये ही जागा शिवसेनेककडे होती म्हणून चंद्रकांत जाधव काँग्रेसकडे गेले. या एकाच घरात भाजपचे दोन नगरसेवक होते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी जयश्री जाधव यांना उमेदवारीची विनंती करावी, असे आमच्या राज्याच्या कोअर कमिटीमध्ये ठरले. त्यानुसार मी त्यांची भेट घेतली.

पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोअर कमिटीचा आपल्यासाठी आग्रह असल्याचे जयश्री जाधव यांना सांगितले. त्यांनीही त्यांची अडचण सांगितली. चंद्रकांत जाधव हे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मग आम्ही पंढरपूर, देगलूर पोटनिवडणुका लढविल्या आहेत तशी आम्हाला ही देखील लढवावी लागेल, असे मी त्यांना सांगितले तरीही कुटुंबियांशी चर्चा करून निर्णय कळवतो असे त्यांनी सांगितले आहे.

एकूणच पाटील यांच्या प्रतिक्रियेतच दोन्ही गोष्टी स्पष्ट झाल्या. जयश्री जाधव भाजपकडून लढणार नाहीत. त्यामुळे भाजप ही निवडणूक लढवणार असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘कोल्हापूर उत्तर’ची निवडणूक लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

भाजप लढणार त्याची दोन कारणे..

- महापालिका निवडणुकीआधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कमळ घराघरांपर्यंत पोहोचवण्याची संधी. या निवडणुकीचा निकाल अनुकूल लागला तर उत्तम, नाही लागला तर महापालिकेसाठी रंगीत तालीम

- विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत त्याच उमेदवारास संधी देऊन ही जागा जिंकायचीच हे टार्गेट.

Web Title: Kolhapur North constituency by election Jayashree Jadhav refuses to contest from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.