कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोट निवडणूक अखेर जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने आज या पोट निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. १२ एप्रिलला या जागेवर मतदान होणार आहे. १७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
या जागेवर भाजप निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने ही लढत दुरंगी होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
उत्तर मतदारसंघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार होता. याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. तर काँग्रेसकडून ही जागा बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. काँग्रेसकडून या जागेवर दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
भाजपने जयश्री जाधव यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र त्यांनी भाजपची ही ऑफर स्पष्टपणे नाकारली. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या जागेवर दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.