कोल्हापूर : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या २८ जणांना सोमवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
यापुढे अशा प्रकारे खासगी मालकीची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडल्याचे निदर्शनास आल्यास जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात, तसेच घरात जनावरे ठेवलेल्या इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रद्द करणेसह त्यांची जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खासगी मालकीची जनावरे बंदिस्त स्वरूपात न ठेवता उघड्यावर मोकाट सोडल्यामुळे ही जनावरे शहरातील प्रमुख चौक, मुख्य रहदारीचे रस्ते, भाजीपाला मार्केट व इतरत्र भटकत असतात. तसेच मुख्य रस्त्यांवर बसून राहतात.
यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत आहे. तसेच या मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ला होत असल्याने नागरिकांना इजा होण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत. रस्त्यावर फिरणारी जनावरे रस्त्यालगत असणारे महापालिकेचे कंटेनरमधील कचरा बाहेर ओढून खातात. तसेच रस्त्यामध्येच नैसर्गिक विधी करून गलिच्छ व बकाल परीस्थिती निर्माण करतात.या मोकाट जनावरांच्या मालकांनी नगररचना व आरोग्य विभाग यांची परवानगी न घेता घरांमध्येच जनावरांचा गोठा तयार केला आहे. अशी जनावरे रस्त्यावर न सोडण्याबाबत वारंवार जनावरांच्या मालकांना सूचना देऊनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र अधिनियम प्राणी कल्याण व छळ प्रतिबंध कायदे अंतर्गत व महानगरपालिका बांधकाम नियमावली कायद्याचा भंग केल्याने शहरातील चंद्रकांत हलके, इब्राहिम बेपारी, मस्ताक बेपारी, फाईम बेपारी, तनवीर बेपारी, लादेन बेपारी, संगीता विलास कांबळे, सुशीला यशवंत कांबळे, बाजीराम कदम, अमर बाबूराम मोहिते, शामराव कवाळे, सागर कवाळे, रामा पसारे, विनोद/गंगा पसारे, केतन पसारे, प्रकाश अळवेकर, शरद आयरेकर, आकाश आयरेकर, संदीप पवार, गजानन पवार, बाळू पवार, पांडुरंग पवार, कुमार पवार, राजू पवार, इम्रान मुल्ला, कृष्णात इंगवले, हिंदुराव मिठारी, तानाजी मिठारी, विलास बाचरेकर, अशा एकूण २८ जनावरांच्या मालकांना आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.तसेच यापुढे अशा प्रकारे खासगी मालकीची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडल्याचे निदर्शनास आल्यास सदर जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून, जनावरे ठेवलेल्या इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यासह त्यांची जनावरे जप्त करण्याची कारवाई महानगरपालिकेकडून येईल, असा इशारा देण्यात आला आहे.