कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती; पण त्यावर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याबाबत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नसल्याने सन २०१० मध्ये देसाई यांनी पुनर्याचिका दाखल केली.
याचदरम्यान इचलकरंजीतूनही कोल्हापूर महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने या दोन्हीही जनहित याचिकेच्या सुनावणी एकत्रित चालविण्यासाठी जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कमिटी नियुक्त केली; पण या कमिटीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या, पण कारवाई होत नसल्याचे पुरावे उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आले.
त्यानुसार उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांना पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे कायदेशीर नमुने घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतील रसायनयुक्त व सांडपाणीयुक्त प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
त्यानुसार पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिकेला अपयश आल्याने त्यांना जबाबदार धरून नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने चौकशी करून कारवाई करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फौजदारी दाखल का करू नये, अशी नोटीस करवीर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सचिन इथापे यांनी महापालिका आयुक्त, जलअभियंता, मुख्याधिकारी, पर्यावरण अधिकाऱ्यांना बजावली आहे. महापालिकेने गुरुवारी दुपारी १ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रांच्या पुराव्यांसह बाजू मांडावी, असे नोटिसीत म्हटले आहे.कोल्हापुरात बुधवारी घेणार नमुनेजयंती नाल्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने बुधवारी पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने करवीर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे घेणार असल्याची माहिती ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी दिली.