कोल्हापूर : जन्मदरातील तफावतीला जबाबदार धरून रुग्णालयांना नोटिसा पाठविल्यामुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादाला तोंड फुटले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांची चांगलीच खडाजंगी झाली.
चोर सोडून सरसकट रुग्णालयांवर केली जाणारी दमदाटी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत कदम यांनी दम दिला, तर ज्यांना नोटीस मान्य नाही, त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.स्थायी समिती सभेचे कामकाज सुरू होताच सत्यजित कदम यांनी रुग्णालयांना पाठविण्यात आलेल्या नोटिसीचा विषय उपस्थित केला. मुलींचा जन्मदर कमी झाला, याला रुग्णालये कशी जबाबदार आहेत? तुम्ही नोटीस कोणत्या आधारावर काढली? असे सवाल उपस्थित करून, कदम यांनी डॉ. पाटील यांना धारेवर धरले.
तुम्हाला शासनाचा अध्यादेश आला आहे का? त्याकरिता आयुक्तांची परवानगी घेतली आहे का? असे प्रश्नही कदम यांनी विचारले. त्यावेळी मला कोणाची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. मला असलेल्या अधिकारात अशा नोटिसा देऊ शकतो, असा खुलासा पाटील यांनी केला.जर तुम्ही अशा काही खटपटीमागे लावल्या, तर रुग्णांना डॉक्टर अॅडमिट करून घेणार नाहीत, अशी भीती कदम यांनी व्यक्त केली. अशा नोटीस काढण्यापूर्वी सोनोग्राफी मशिन चेक करा, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यावेळी तुम्हाला आमचे काम मान्य नसेल, तर नोटीस मागे घेतो, असे सांगताच दोघांतील वाद आणखीच वाढला. शेवटी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी मध्यस्थी करून नोटीस मागे घेण्याचा विचार करू, असे सांगितले.जरगनगर प्रभागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार सांगून सुधारणा नाही. शाहू बँक चौकात मोठे लिकेज आहे. सण उत्सव काळात पाणी येत नाही. कावळा नाका ते बापट कॅम्प परिसरात कर्मचारी रजेवर गेल्याने पाणी नव्हते.
ताराबाई पार्क येथील व्हॉल दुरुस्तीचे काम गेले दीड वर्ष सुरू आहे. कदमवाडीत पाणी कमी प्रमाणात येते, अशा तक्रारी करतानाच दसरा दिवाळी सण समारंभाच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, अशी सूचना गीता गुरव, सुनंदा मोहिते, कविता माने, आदींनी केली.कावळा नाका येथील कर्मचाऱ्यास नोटीस काढली आहे. ई वॉर्डला डिस्चार्ज वाढवण्यात येईल. कदमवाडी येथे व्हॉल सात ते आठ फुट जमिनीखाली गेले आहेत. जुने नकाशे काढून तपासणी करावी लागणार आहे, असा खुलासा पाणी पुरवठा विभागाने यावेळी केला.राजारामपुरीतील माउली चौक येथे चौक सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याठिकाणी कारंजासाठी असलेले पाण्याचे कनेक्शन बंद केले आहे, ते तातडीने सुरू करावे, तसेच लाईटची व्यवस्थाही सुरू करण्यात यावी, अशी सूचना भाग्यश्री शेटके यांनी केली.