कोल्हापूर : गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली.करवीर नगर वाचन मंदिर येथे आयोजित भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘बदलता गाव-एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कनवा’चे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते. प्रमुख उपस्थिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, ‘कनवा’चे कार्यवाह सतीश कुलकर्णी, दीपक गाडवे, प्रा. अनंत जयतीर्थ आदींची होती.प्रा. खोत म्हणाले, ग्रामशैली आता बदलत चालली आहे. अगदी चुलीपासून स्वयंपाकघर, गोठा यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या सुधारणा म्हणायच्या की सूज हाच एक प्रश्न निर्माण झाला आहे. माणसांनी आता घरांबरोबर ग्रामदैवतही बदलली आहेत. या देवतांऐवजी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीच मंदिरे झाली आहेत.
कारण गावातील एका राजकीय गटाकडून एका देवाचे मंदिर बांधले तर दुसऱ्या गटाकडून त्याच देवाचे मंदिर बांधले जाते. त्यामुळे मूळ ग्रामदैवताकडे दुर्लक्ष होऊन ते अडगळीत पडून सोयी-सुविधांपासून वंचित राहत असल्याचे सद्य:चित्र आहे.ते पुढे म्हणाले, गावातील चुलीवर काय शिजतयं त्यावर तेथील संस्कृती, अर्थशास्त्र व समाजशास्त्र कळायचे, परंतु त्या चुलीवर काय शिजत नसेल तर नक्कीच काही तरी अर्थशास्त्र बिघडले आहे हे समजून यायचे. सर्वाधिक प्रयोग हे शेती व शिक्षणावर झाले; परंतु दुर्दैवाने दोन्ही क्षेत्रे मागे आहेत.
शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न झाला पण शेतकऱ्यांचा नाही हे वास्तव आहे. पूर्वी शेतीत राबविली जाणारी पद्धतीच आता नव्याने सांगितली जात आहे. ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.