सचिन भोसलेकोल्हापूर : सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र कार्यालयाने गेल्या वर्षभरात मापात पाप व उद्घोषणा केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादा किंमत आकारणी केलेल्या ५१३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे; तर वजनकाटा पडताळणी मुद्रांक शुल्कातून १ कोटी ५८ लाख ३६ हजार ९७७ रुपयांचा महसूलही गोळा केला आहे. त्यामुळे यापुढे ‘मापात पाप’ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर या कार्यालयाची करडी नजर राहणार आहे.गेल्या वर्षभरात या कार्यालयाने आपल्या निरीक्षकांद्वारे वजनमापे पडताळणी मुद्रांक न केलेल्या व्यापाऱ्यांकडून ४२५, तर आवश्यक वस्तूंची उद्घोषणा नसलेल्या व जादा दराने, उत्पादनाची तारीख नसलेल्या अशा ८८ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यातून १३ लाख ३४ हजार २०० रुपये इतका दंड आकारला आहे.
यासह वर्षभरात २९ हजार ३३७ व्यापारी, उद्योग, फेरीवाले, सहकारी संस्था, आदींकडून वजनमापे पडताळणी मुद्रांक शुल्क म्हणून १ कोटी ५८ लाख ३६ हजार ९७७ रुपयांचा महसूल जमा केला आहे. या कार्यालयांतर्गत पेट्रोल पंप, सोनार, किराणा, धान्य, हार्डवेअर, दूध विक्रेते, केमिकल विक्रेते, सहकारी संस्था, मॉल, उद्योग, आदींचा समावेश आहे. काटा दांडी, इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजने यांचा समावेश आहे.
उल्लंघन आढळल्यास कार्यालय वस्तू, वजनमापे जप्त करू शकतात. नव्याने काटा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना एक वर्षानंतर पडताळणी मुद्रांक करून घेणे अनिवार्य असते. यासह ज्या ग्राहकांना अशाबाबत तक्रार करावयाची असेल तर ०२३१२५४२५४९ या क्रमांकावर ती नोंद करता येते. त्यामुळे ग्राहकांनी नि:संकोचपणे संपर्क साधावा.पडताळणी मुद्रांक (रिकॅलिब्रेशन) केलेली संख्या अशी
- व्यापारी - २१,३६३
- उद्योग- ९९०
- फेरीवाले - २६४२
- सहकारी संस्था - ४३४२
एकूण - २९,३३७जादा दराने अवेष्टित वस्तू, वजनमापात तूट येत असेल तर या आस्थापनांवर देखरेख करण्यासाठी व त्यांचे प्रबोधन करण्यासाठी सात सदस्यीय दक्षता समितीची स्थापना केली आहे. यात अशोक देसाई, हर्षद कुंभोजकर, हितेंद्र पटेल, अशोक कोळवणकर, श्रीकांत कुंटे, संजय हुक्केरी, रेखा हंजे यांचा समावेश आहे. महिन्यातील तिसºया सोमवारी या समितीची बैठक होते.
व्यापाऱ्यांनी आपले वजनकाटे, मग ते डिजिटल अथवा मेकॅनिकल असू देत; त्यांची वर्षातून एकदा पडताळणी करून मुद्रांक घेणे अनिवार्य आहे. जे करणार नाहीत अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यातून कमीत कमी दोन हजार व जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो.- नरेंद्रसिंह मोहनसिंह, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र, कोल्हापूर