कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या परिचलन बैठकीतील निर्णयानुसार आॅटोरिक्षाच्या भाडेदर वाढीस शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्यानुसार पहिल्या एक किलोमीटर अंतरासाठी २० रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.यापूर्वी पहिल्या एक किलोमीटरसाठी १७ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये दर होता. गेल्या महिन्याभरापासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेत पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतुकीचा एक हिस्सा असलेल्या आॅटोरिक्षा चालकांवरही झाला. त्याचा एकंदरीत विचार करता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्ष असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत सरकारी नियमानुसार पहिल्या एक किलोमीटरसाठी २०, तर पुढील प्रत्येक किलोमीटरला १७ असा दर निश्चित केला आहे.
या भाडेवाढीचा फायदा जिल्ह्यातील तीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना होणार आहे . आॅटोरिक्षा परवानाधारकांना सुधारित भाडेदराप्रमाणे मीटरचे पुनर्प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) ४५ दिवसांच्या आत म्हणजे २१ जुलैपर्यंत करणे बंधनकारक आहे. मीटरचे पुनर्प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) केल्याशिवाय नवीन दराने भाडे आकारणी केल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास परवानाधारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिला आहे.जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक रिक्षा परवानाधारक आहेत. त्यातील कोल्हापूर शहरात १३ हजार रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश रिक्षाचालक शेअर-ए-रिक्षा पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी जुलै २०१६ ला १४ रुपयांऐवजी १७ रुपये अशी तीन रुपये भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी तीन रुपयांनीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षात बसताच प्रवाशांना २० रुपये मोजावे लागणार आहेत.
जनतेचा विचार करून मनात नसतानाही व पेट्रोल परवडत नसल्याने ही दरवाढ आम्ही मान्य करीत आहोत. या भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याचे प्रवासी नाराज होणार आहेत. त्याचाही फटका आम्हा रिक्षाचालकांना बसणार आहे.- चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना